Ravisheth Patil Pen
काँग्रेस चे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रवीशेठ पाटील भाजपात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री रवीशेठ पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रवेश घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली ती माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी.
बऱ्याच काळापासून काँग्रेस मधील नेत्यांवर नाराज असल्याने रविशेठ पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रवीशेठ पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने येणाऱ्या निवडणुकीच्या काळात काँग्रेसला रायगड जिल्ह्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण विधान मतदारसंघातून दोन वेळा निवडून आल्यानंतर रविशेठ पाटील यांनी राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपदावर काम केले होते. काही वर्षे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केले होते. मधल्या काही काळात रवीशेठ पाटील हे शिवसेनेमध्ये जाणार, अशाही चर्चा होत होत्या, पण रवीशेठ पाटील यांनी कमळ हातात घेत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
येत्या निवडणुकीत जर शिवसेनेबरोबर युती झाली नाही तर रामशेठ ठाकूर ह्यांना लोकसभेचे तिकीट मिळू शकते. त्यासाठी त्यांनी आतापासून तयारी चालू केलीय असे बोलणे अतिशयोक्ती ठरू नये.
