घाऊक भावावर आधारित चलनफुगवट्याचा दर डिसेंबरमधे गेल्या २२ महिन्यातल्या नीचांकी पातळीवर
मुंबई, दि. १७: घाऊक भावावर आधारित महागाईचा दर डिसेंबर २०२२ मध्ये ४ पूर्णांक ९५ शतांश टक्के इतका राहिला असून, तो गेल्या २२ महिन्यांमधल्या सर्वात कमी पातळीवर आहे. अन्नधान्य, विशेषतः भाज्या आणि तेल बियांचे भाव कमी झाल्यामुळे ही घट झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.
या काळात अन्नधान्याच्या भावात ६५ शतांश टक्के घट झाली. इंधन आणि विजेचा दर नोव्हेंबरमध्ये १७ पूर्णांक ३५ शतांश टक्के इतका होता, डिसेंबरमध्ये यात वाढ होऊन तो १८ पूर्णांक ९ शतांश टक्के इतका राहिला. तर, उत्पादनांचे भाव कमी होऊन ते ३ पूर्णांक ३७ टक्क्यावर आल्याचं यात म्हटलं आहे.
