अवकाळी पावसामुळे कोकणातील आंब्याला धोका आहे का? जाणून घ्या राज्यात कोणत्या भागात कोसळणार पाऊस
मुंबई, दि. ७: एका बाजूला महाराष्ट्रासह देशात उष्णतेची लाट असताना दुसऱ्या बाजूला आज राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत आज अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यात यल्लो अलर्ट जाहीर केला आहे. राज्यात पुढील चार दिवस वातावरण ढगाळ राहणार असून काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, नागपूर, गोंदिया व यवतमाळ या जिल्ह्यांत येलो अलर्ट तर चंद्रपूर व गडचिरोली येथे गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
