आंदोलक सुनील कावळे यांच्या आत्महत्येनंतर मराठा मोर्चा चे समन्वयक विनोद पाटील यांनी व्यक्त केले आपले मत
मुंबई, दि. १९: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकाने आज १९ ऑक्टोबर रोजी मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुनील कावळे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचे वय ४५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावर सुनील कावळे यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेली व्यक्ती अंबड तालुक्यातील रहिवासी असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात नेण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यतील राजकीय वातावरण तापले आहे. वांद्रे खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे.
सदर घटनेनंतर मराठा मोर्चा चे समन्वयक विनोद पाटील यांनी एक ट्वीट करत मराठा आरक्षणासाठी आंदोलनात उतरलेल्या बांधवांना सबुरीचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. हुतात्मा सुनील बाबुराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”
