“माझ्या कुटुंबाला एकही पैसा नकोय, न्याय हवाय न्याय !”; उन्नाव कांडातील पीडितेच्या वडिलांचा आक्रोश
उत्तर प्रदेश: उन्नाव कांडातील पीडितेच्या मृत्यूनंतर तिचं कुटुंब मोठ्या धक्क्यात आहे. पीडितेच्या वडीलांनी आज सांगितलं की मृत्यूचा बदला मृत्यूनेच पूर्ण होऊ शकतो. गुन्हेगारांना कोणताही विलंब न लावता फाशी मिळावी अथवा त्यांना पळवून पळवून गोळ्या मारण्यात याव्या. त्याचवेळी या प्रकरणी राजकारणही तापलं आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज उत्तरप्रदेश विधानसभेबाहेर धरणं धरलं. तर दुसरीकडे काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की “या कुटुंबाला गेल्या एक वर्षापासून धमकावलं जातंय. मी आरोपींच्या भाजपशी असलेल्या संबंधांबाबत ऐकलं आहे. उत्तर प्रदेशात गुन्हेगारांच्या मनात भीतीच राहिली नाहीये.
या प्रकरणी पीडितेचे वडील म्हणाले की, “माझ्या कुटुंबाला एकही पैसा नकोय, माझ्या मुलीला न्याय हवाय. हे आरोपी खुलेआम कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होते. अनेक वेळा त्यांनी धमकी दिली की जर खटला मागे घेतला नाही तर मुलीसकट संपूर्ण कुटुंबाला आग लावून टाकू. आम्ही पोलिसांना या बाबत माहिती दिली, पण त्यांनी दरवेळी टाळाटाळ केली. मुलीच्या मृत्यूची खबर आम्हाला वर्तमानपत्रातून मिळाली. पोलीस किंवा प्रशासनाचा कोणताच माणूस आम्हाला ही बातमी कळवायला नाही आला. आमच्या आमदारानेही याबाबत कोणतीच विचारपूस नाही केली.”
मुळात या मृत पीडित तरुणीच्या वडिलांची आर्तता मन हेलावून टाकते. आज देशाचे मॉडर्न “इंडिया” आणि मध्ययुगात जगणारा “भारत” असे दोन भाग पाडलेले दिसत आहे. अशा घटना कानी पडल्या की नव्या युगाच्या “भारताचा” उदय व्हायला अद्याप बराच काळ बाकी आहे हे स्पष्ट जाणवते.
