जागांची योग्य माहिती मिळणेसाठीचा प्रस्ताव सिडको उलवे-१ कार्यालयाकडून सिडकोच्या नियोजन विभागाकडे पाठवण्यात आला
नवी मुंबई, दि. ३०: नवी मुंबई येथील उलवे नोड मध्ये सिडको ने सार्वजनिक शौचालयांची उभारणीच न केल्याच्या अजब कारभाराकडे वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अतुल शिलवंत यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या संबंधी अतुल शिलवंत यांनी सिडको चे व्यवस्थापकीय संचालक व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे उलवे नोड येथील प्रत्येक सेक्टर मध्ये एक सार्वजनिक शौचालय/मुतार्या आदीची उभारणी करण्याबाबत विनंती केली होती व पुढे या मागणी संबंधी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा ही केला होता. या पाठपुराव्याला अखेर आता यश आले आहे. सिडको कडून पत्राद्वारे अधिकृतरित्या कळविण्यात आले आहे की उलवे येथील प्रत्येक सेक्टर मध्ये सार्वजनिक शौचालय/मुतार्या उभारणीच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या जागांची योग्य माहिती मिळणेसाठीचा प्रस्ताव सिडको उलवे-१ कार्यालयाकडून सिडकोच्या नियोजन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून अभिप्राय मिळाल्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही करता येऊ शकेल. सिडको उलवे – १ चे कार्यकारी अभियंता एम. व्हि. वाळिंबे यांनी पत्राद्वारे अतुल शिलवंत यांना पुढील कार्यवाही बाबत अवगत केले आहे.

या सार्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना अतुल शिलवंत म्हणाले की मागील काही काळापासून आम्ही या मागणीबाबत सिडको प्रशासनाकडे नियमितपणे पाठपुरावा करत होतो. त्याच सोबत आम्ही मंत्रालयीन स्तरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांसोबत ही पत्रव्यवहार केला होता. उलवे नोड मध्ये विकासकामे करताना सिडको ने सार्वजनिक शौचालयेच न उभारल्याकडे सर्वांचे आधी लक्ष वेधले. यानंतर येथे प्रत्येक सेक्टर मध्ये सार्वजनिक शौचालयांची गरज का आहे, ते नसल्यामुळे नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना उलवेकरांना विशेषतः महिला व वयोवृद्ध नागरिकांना करावा लागतोय हे अधिकार्यांच्या व मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या नजरेस आणून दिले. सिडको ने या सार्याची दखल घेतली व त्यादृष्टीने पहिले पाऊल टाकत सार्वजनिक शौचालयांसाठीच्या उचित जागांचा शोध घेण्यास प्रारंभ केल्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सिडको अधिकार्यांचे आभार मानतो. हा समस्त उलवेकरांच्या एकजुटीचा विजय असल्याचे अतुल शिलवंत पुढे म्हणाले.
संबंधित बातमी जरूर वाचा
१० डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र वार्ता ने या संबंधी एक वृत्त प्रसारित केले होते. यावेळी अतुल शिलवंत म्हणाले होते की, “सार्वजनिक शौचालयं नसल्यामुळे उलव्यातील सामान्य नागरिकांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुळात उपलब्ध माहिती नुसार १,६८,५६७ इतकी लोकसंख्या असलेल्या उलवे नोड सारख्या स्मार्ट सिटि मध्ये सार्वजनिक शौचालयांची वानवा असणे नक्कीच भूषावह नाही. एकवेळ पुरुषाला लघवीला झाली तर नाईलाजास्तव का असेना तो कुठेतरी कोपरा पाहून लघुशंका करू शकतो पण महिलांचे काय? त्यांनी कुठे जायचं? घरातून कामानिमित्त अथवा शाळा-कॉलेज साठी बाहेर पडणार्या महिला वर्गाला जर लघुशंकेला जाण्याची आपत्कालीन परिस्थिति उद्भवली तर त्यांना वाट पाहत आपल्या इस्पित स्थळी पोहोचण्याशिवाय गत्यंतर नाही. भविष्यात यामुळे त्यांना गंभीर शारीरिक व्याधींचा सामना करावा लागू शकतो. याच सोबत मधुमेह, मूत्रपिंडाशी निगडीत आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे तर खूपच हाल होत आहेत.”

अखेर उलवे नोड येथे प्रत्येक सेक्टर मध्ये सार्वजनिक शौचालये उभारण्याबाबत सिडको ने दखल घेतल्यामुळे उलवेकरांनी समाधान व्यक्त केले आहे. अतुल शिलवंत हे वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी या आधी राज्यातील काही मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. ६९३ कोटी रुपयांचा मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल निविदा घोटाळा उघड करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.