मावळ्यांचे सरकार पाहिजे की मावळ्यांवर गोळीबार करणारे सरकार पाहिजे? : उद्धव ठाकरे
पुणे: आमची युती ही शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य माणसांसाठी झालेली आहे. जाहिरांतींमधून लाज वाटते का? असे आम्हाला विचारणारे यांचा कधी लाजेशी संबंध आला आहे का?. जनतेसमोर मतं मागताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असे म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोफ डागली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ काळेवाडी फाटा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली.
बारामतीची भानामती आता संपली आहे. संपूर्ण जिल्ह्यावर पवार कुटुंबांचा हक्क नाही, असा घणाघात करतानाच तुम्हाला मावळमध्ये मालक पाहिजे की सोबती. मावळ्यांचे सरकार पाहिजे की मावळ्यांवर गोळीबार करणारे सरकार पाहिजे? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
बांगलादेश हा आपला शत्रू आहे. बांगलादेशींना लाथ मारून हाकलून द्या असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते. मात्र, विरोधक बांगलादेश वरून सिनेकलाकार निवडणुकीसाठी बोलावून घेत आहे. ज्यांना देशाचा इतिहास माहिती नाही अशा व्यक्तींना तुम्ही खासदार म्हणून दिल्लीत पाठवणार आहात का? असा घणाघाती सवाल त्यांनी उपस्थिनांना केला.
स्वातंत्र्यलढ्यात यातना भोगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आम्ही आदर करतो. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे वीर जन्माला आले नसते तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सत्तेचे स्वप्न पाहू शकले नसते. पंडित जवहारलाल नेहरु यांनी सावरकांइतक्या हालअपेष्टा तुरुंगात भोगल्या असतील तर नेहरुंनाही वीर जवाहरलाल नेहरु असे म्हणायला मी तयार असल्याचेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी देशद्रोहाचा कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. मग देशावर राज्य कोण करणार, उद्या दाऊद इब्राहिमही भारतात येईल, बिनधास्त फिरेल कारण त्याच्यावर देशद्रोहाचा खटलाच चालणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी राजीव गांधी यांना देखील दगा दिला होता. त्यावेळी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले होते, मी एक वेळ तोंडाला काळे फासून हिमालयात निघून जाईन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही. कुठे गेला हिमालय कुठे गेले ? ते काळे तोंड.?, असा सवाल त्यांनी शरद पवार यांना विचारला.
आमचं ठरलं दिल्लीत पुन्हा युतीचीच सत्ता येणार. देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच होणार. देशद्रोह करणाऱ्यांना आम्ही फासावर लटकणार हे आमचं ध्येय आहे आणि त्यासाठी बरणेंना पुन्हा खासदार होण्याची संधी द्या असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मावळकरांना केले आहे.
