Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बौद्धिक स्वामित्व कार्यालयाव्यतिरिक्त पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय (टीकेडीएल)चे माहिती भांडार वापरण्यासाठी व्यापक प्रवेश देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

बौद्धिक स्वामित्व कार्यालयाव्यतिरिक्त पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय (टीकेडीएल)चे माहिती भांडार वापरण्यासाठी व्यापक प्रवेश देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्‍ली, दि. १७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बौद्धिक स्वामित्व कार्यालयाव्यतिरिक्त पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालयाच्या(टीकेडीएल) माहिती भांडाराचा वापर करण्यासाठी व्यापक प्रवेश देण्यास मान्यता दिली. वापरकर्त्यांसाठी टीकेडीएलचे माहिती भांडार मुक्त करणे ही भारत सरकारच्या दृष्टीने महत्वाकांक्षी आणि दूरगामी परिणाम करणारी कृती आहे. असा मुक्त प्रवेश देणे म्हणजे भारतीय पारंपरिक ज्ञानासाठी एक नवीन पहाट असणार आहे. टीकेडीएलच्यावतीने विविध क्षेत्रांमध्ये भारताचा अमूल्य वारसा यावर संशोधन आणि विकास तसेच नवोन्मेषी कल्पनांच्या आधारे काम केले जात आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत भारतीय ज्ञान परंपरांच्या माध्यमातून विचार आणि ज्ञान यामध्ये नेतृत्व विकसित करण्याचे काम टीकेडीएलमध्ये केले जात आहे.

भारतीय पारंपरिक ज्ञानामध्ये राष्ट्रीय आणि वैश्विक गरजांची पूर्तता करण्याची पुरेपूर क्षमता आहे. या माध्यमातून सामाजिक लाभ त्याचबरोबर आर्थिक विकास साध्य होतो. उदाहरणार्थ – आपल्या देशातल्या पारंपरिक औषध आणि निरामय आरोग्य प्रणाली म्हणजे आयुर्वेद आहे. तसेच सिद्ध, युनानी, सोवा, रिग्पा आणि योग हे आजही देशामध्ये आणि परदेशांमध्ये लोकांच्या गरजा पूर्ण करीत आहेत. अलिकडे कोविड-19 महामारीच्या काळामध्ये भारतीय पारंपरिक औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. त्याचा लाभ रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्याचबरोबर रोगाची लक्षण ओळखणे, रोगापासून मुक्ती मिळवणे यासाठी तसेच विषाणूविरोधात ही औषधे उपयोगी ठरली. या वर्षी प्रारंभी, एप्रिलमध्ये डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने भारतामध्ये पहिले ऑफ शोअर जीसीटीएम म्हणजेच पारंपरिक औषधांचे वैश्विक केंद्र स्थापित केले आहे. यामुळे संपूर्ण जगाच्या सध्याच्या आणि उदयोन्मुख गरजांची पूर्तता करण्यासाठी पारंपरिक ज्ञानाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय पारंपरिक ज्ञान असलेल्या ग्रंथालयामधील माहितीचा खजिना आता बौद्धिक स्वामित्व कार्यालयांव्यतिरिक्त इतरांनाही व्यापकतेने उपलब्ध करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये व्यापार वाढविण्यासाठी मदत मिळणार आहे. सध्याच्या पद्धतींसोबत पारंपरिक ज्ञान एकत्रित करणे आणि सह पर्याय यावर भर देण्यात आला आहे. ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सीमा वाढविण्यासाठी टीकेडीएल हा पारंपरिक ज्ञान माहितीचा एक महत्वपूर्ण स्त्रोत म्हणून काम करणार आहे. टीकेडीएलची सध्याची सामुग्री भारतीय पारंपरिक औषधांचा व्यापक स्वीकार सुलभ करेल. त्याचबरोबर नवीन उत्पादक आणि नवोन्मेषींना आपल्या मौल्यवान ज्ञानाच्या वारशाचा फायदा घेता येवून नवीन उद्योग करण्यास प्रोत्साहन मिळू शकणार आहे.

कोणत्याही उद्योगासाठी ज्ञानाचा आधार म्हणून वापरताना टीकेडीएलची मोठीच मदत होणार आहे. यामध्ये व्यवसाय, कंपन्या,(हर्बल हेल्थकेअर, (आयुष, फार्मास्युटिकल्स, फायटोफार्मास्युटिकल्स आणि न्यूट्रास्युटिकल्स), वैयक्तिक काळजी आणि इतर एफएमसीजी) संशोधन संस्था, सार्वजनिक आणि खाजगी, शैक्षणिक संस्था, अध्यापक आणि विद्यार्थी तसेच इतर, आयएसएमची प्रॅक्टिस करणारे, ज्ञानवंत, बौद्धिक स्वामित्व घेणारे आणि त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी आणि सरकार यांच्यासह इतरांना टीकेडीएलच्या माहिती भांडारामध्ये प्रवेश करणे शक्य होणार आहे. यासाठी संबंधितांना सशुल्क सदस्यत्व घेता येणार आहे. तसेच हे ज्ञान भांडार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वापरकर्त्यांसाठी टप्प्या टप्प्याने मुक्त करण्यात येणार आहे.

भविष्यकाळात इतर डोमेनवरील भारतीय पारंपरिक ज्ञानासंबंधीची माहिती ‘‘3 पी- प्रीझर्व्हेशन, प्रोटेक्शन आणि प्रमोशन’’ च्या आधारे टीकेडीएल माहिती खजिन्यामध्ये समाविष्ट केली जाणार आहे. भारतीय पारंपरिक ज्ञानाचा आधारे चुकीचे बौद्धिक स्वामित्व कुणालाही घेता येवू नये, अशा गोष्टी रोखता याव्यात यासाठी ही प्रकारे प्राथमिक तयारी आणि प्रभावी उपाय आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून टीकेडीएलच्या ज्ञान भंडाराच्या आधारे चांगल्या पद्धतीने नवनवीन शोध घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कामही यामुळे होणार आहे. भारताचा समृद्ध वारसा नव्या सामाजिक-आर्थिक विकासाचा भक्कम पाया तयार करणार आहे.

टीकेडीएल विषयी माहिती:- पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालयाची स्थापना २००१ मध्ये झाली. यामध्ये भारतीय पारंपरिक ज्ञानाचा तसेच पूर्व कलांविषयीच्या माहितीचे भांडार – डेटाबेस तयार करण्यात आले आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि भारतीय औषध आणि होमिओपॅथी विभाग (आयएसएम अॅड एच, आत्ताचे आयुष मंत्रालय) यांनी ते स्थापन केले. टीकेडीएल ही असे वेगळ्या स्वरूपात कार्यरत असणारी जागतिक स्तरावर पहिलीच संस्था आहे. विशेष म्हणजे इतर देशांसाठीही ही संस्था अनुकरणीय ठरली आहे. टीकेडीएलमध्ये सध्या आयुर्वेद,युनानी, सिद्ध, सोवा, रिग्पा आणि योग यासारख्या आयएसएमशी संबंधित साहित्याची माहिती जमा करण्यात आली आहे. या माहितीचे इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या पाच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये डिजिटल स्वरूपात दस्तऐवजीकरण केले आहे. बौद्धिक स्वामित्वाचे चुकीचे अनुदान रोखण्यासाइी टीकेडीएल जगभरातल्या बौद्धिक स्वामित्व कार्यालयातल्या प्रज्ञा परीक्षकांना माहिती होईल, अशा भाषांमध्ये आणि स्वरूपामध्ये माहिती पुरविण्याचे काम करते. आत्तापर्यंत टीकेडीएलच्या माहिती खजिन्याचा वापर जगभरातल्या १४ बौद्धिक स्वामित्व कार्यालयांनाच करणे शक्य होते. आता हे निर्बंध काढून टाकण्यात येणार आहेत. भारतीय पारंपरिक ज्ञानाचा गैरवापर होवू नये, यासाठी टीकेडीएलचा जागतिक स्तरावर वापर केला जावू शकणार आहे. हा जागतिक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *