‘देवखेल’, ‘आदर्श बाल विद्यालय’, ‘मयसभा’ आणि ‘मुसाफिर कॅफे’चाही समावेश; २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात रंगणार ५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
पणजी, दि. १९ : गोवा येथे होणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (IFFI) ओटीटी पुरस्कारांसाठी यंदा पाच वेब मालिकांची निवड करण्यात आली आहे. ‘आदर्श बाल विद्यालय’, ‘देवखेल’, ‘मेड इन इंडिया : अ टायटन स्टोरी’, ‘मयसभा : द राईज ऑफ द टायटन्स’ आणि ‘मुसाफिर कॅफे’ या मालिकांना ‘सर्वोत्कृष्ट वेब मालिका’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. शिक्षणव्यवस्थेतील प्रश्नांपासून लोककथा, उद्योगविश्व, राजकीय संघर्ष आणि मानवी नात्यांपर्यंत विविध विषयांना या मालिकांनी कथारूप दिले आहे.
२० ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गोव्यात ५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवातील ओटीटी पुरस्कार विभागातून भारतीय डिजिटल मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयांवरील निर्मितींची दखल घेतली जाणार आहे.
शिक्षणव्यवस्थेवर विनोदी भाष्य करणारी ‘आदर्श बाल विद्यालय’
हिमांक गौर दिग्दर्शित ‘आदर्श बाल विद्यालय’ ही मालिका दिल्लीतील सरकारी शाळेच्या पार्श्वभूमीवर उलगडते. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर त्रिपाठी यांचे केंब्रिजला जाण्याचे स्वप्न विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीवर अवलंबून असते. मात्र, अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांची अनास्था, शाळेतील प्रशासकीय अडचणी आणि प्रतिकूल शैक्षणिक वातावरण यामुळे त्यांच्यासमोर आव्हाने उभी राहतात.
या परिस्थितीत एका आदर्शवादी शिक्षकाच्या आगमनामुळे शाळेत बदल घडवण्याची आशा निर्माण होते. विनोदी शैलीतून सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि शिक्षकांच्या योगदानाचा वेध ही मालिका घेते.
लोककथा आणि रहस्याचा संगम ‘देवखेल’
चंद्रकांत लता गायकवाड दिग्दर्शित ‘देवखेल’ ही मालिका ‘देवताली’ या काल्पनिक गावातील रहस्यमय घटनांभोवती फिरते. गावात दरवर्षी होळीच्या रात्री एका व्यक्तीचा मृत्यू होतो. या घटनांमागे ‘शंकासुर’ नावाच्या पौराणिक राक्षसाचा हात असल्याची स्थानिकांची धारणा आहे.
पुन्हा एकदा अशाच प्रकारचा मृत्यू घडल्यानंतर पोलीस निरीक्षक विश्वास तपास सुरू करतात. त्यातून गावातील दडलेली रहस्ये, व्यक्तींचे हेतू आणि परंपरांशी जोडलेल्या समजुती समोर येतात. गुन्हेगारी तपासाच्या चौकटीतून लोककथा, श्रद्धा आणि वास्तव यांचा परस्परसंबंध मांडण्याचा प्रयत्न या मालिकेत करण्यात आला आहे.
‘मेड इन इंडिया’मधून टायटनच्या उभारणीचा प्रवास
रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित ‘मेड इन इंडिया : अ टायटन स्टोरी’ ही मालिका भारतीय घड्याळ उद्योगातील एका महत्त्वाच्या ब्रँडच्या निर्मितीची कहाणी सांगते. उदारीकरणापूर्वीच्या काळात झेरक्सेस देसाई यांनी जागतिक दर्जाचा भारतीय घड्याळ ब्रँड उभारण्याचे ध्येय समोर ठेवले होते. त्या वेळी बाजारपेठेत परदेशी उत्पादने आणि तस्करीद्वारे आणलेल्या घड्याळांचे वर्चस्व होते.
जे.आर.डी. टाटा यांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांच्या पाठबळाच्या आधारे देसाई यांनी नोकरशाहीतील अडथळे, आर्थिक मर्यादा आणि तांत्रिक आव्हानांचा सामना केला. एका औद्योगिक संकल्पनेचे यशस्वी ब्रँडमध्ये रूपांतर घडवणाऱ्या उद्योजकीय दृष्टिकोनाचा मागोवा ही मालिका घेते.
राजकीय मैत्रीचे प्रतिस्पर्धेत रूपांतर : ‘मयसभा’
देवा कट्टा दिग्दर्शित ‘मयसभा : द राईज ऑफ द टायटन्स’ची कथा १९७० च्या दशकातील आंध्र प्रदेशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत घडते. काकर्ला कृष्णमा नायडू (केकेएन) हा आदर्शवादी विद्यार्थी नेता आणि प्रभावशाली कुटुंबातील तरुण एम.एस. रामीरेड्डी या दोन पात्रांभोवती मालिकेचे कथानक गुंफले आहे.
सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाची स्वप्ने पाहणाऱ्या या दोघांची सुरुवातीची मैत्री पुढे परिस्थितीमुळे बदलत जाते. जातिभेद, आर्थिक हितसंबंध, भ्रष्टाचार आणि सत्तासंघर्ष यांचा त्यांच्या नात्यावर परिणाम होतो. जवळचे सहकारी असलेले हे दोघे पुढे राजकीय प्रतिस्पर्धी कसे बनतात, याचे चित्रण मालिकेत करण्यात आले आहे.
प्रेम आणि आत्मशोधाचा भावनिक प्रवास ‘मुसाफिर कॅफे’
रुचिर अरुण दिग्दर्शित ‘मुसाफिर कॅफे’मध्ये चंदर मोहन शर्मा, सुधा आणि प्रीती यांच्यातील नातेसंबंध केंद्रस्थानी आहेत. भोपाळ आणि मसुरीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा प्रेम, सहजीवन, वैयक्तिक निर्णय आणि आयुष्यातील अनपेक्षित वळणांचा मागोवा घेते.
बदलत्या परिस्थितीत चंदर मोहनच्या भावविश्वात होणारे बदल, हुकलेल्या संधी आणि नात्यांमधील स्वीकार यांचा वेध या मालिकेत घेतला आहे. मानवी संबंधांकडे भावनिक आणि व्यक्तिगत दृष्टिकोनातून पाहणारी ही निर्मिती आहे.

विविध विषयांमुळे ओटीटी कथाविश्वाचे व्यापक चित्र
या पाचही मालिकांचे विषय आणि कथनशैली वेगवेगळी आहे. एका बाजूला शिक्षण आणि ग्रामीण लोकपरंपरांशी संबंधित कथानके आहेत, तर दुसरीकडे उद्योगक्षेत्राचा इतिहास, राजकीय सत्तासंघर्ष आणि वैयक्तिक नात्यांमधील गुंतागुंत मांडण्यात आली आहे.
५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा सर्वोत्कृष्ट वेब मालिका (ओटीटी) पुरस्कार डिजिटल माध्यमासाठी तयार झालेल्या दर्जेदार निर्मितींचा गौरव करणार आहे. या नामांकनांमुळे लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मिती पथकांच्या कामाला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळणार असून, भारतीय ओटीटी क्षेत्रातील विषयवैविध्यही अधोरेखित होणार आहे.
Thumbnail Image Credit/Source – Amazon and MX Player
