‘धारावी पॅटर्न’ च्या धर्तीवर कोरोना मुक्तीसाठी ठाणे मनपाने सुरू केली ‘मिशन झिरो’ मोहीम
ठाणे: कोरोना साथीच्या संकटकाळात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबईतील धारावी पॅटर्नच्या धर्तीवर आजपासून ठाणे महानगरपालिका व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन झिरो’ या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. आज ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगर पालिका आयुक्त विपीन शर्मा, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत ठाणे महापालिका परिक्षेत्रात कंटेनमेंट झोन व हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या विभागांमध्ये डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी तसेच तंत्रक उपकरणांनी सुसज्ज तब्बल नऊ मोबाईल डिस्पेंसरी तैनात करण्यात येणार असून त्या विभागातील रहिवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. या डिस्पेंसरींच्या माध्यमातून कोविड-१९ रुग्णांना शोधून झटपट चाचणी, निदान व उपचार करणे शक्य होणार आहे.
