‘विवाह टिकवण्यामध्ये सामोपचार आणि समुपदेशकाची भूमिका’ या विषयावर दक्षिण कमांडकडून एका परिसंवादाचे आयोजन
मुंबई, दि. १६: ‘विवाह टिकवण्यामध्ये सामोपचार आणि समुपदेशकाची भूमिका’ या विषयावर दक्षिण कमांड मुख्यालयाने १५ एप्रिल २०२३ रोजी एका परिसंवादाचे आयोजन केले. विवाहित जोडप्यांमध्ये भक्कम आणि निकोप नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी प्रभावी पद्धती शिकण्याची संधी या परिसंवादाच्या निमित्ताने हितधारकांना उपलब्ध झाली होती.
नातेसंबंध समुपदेशक आणि कुटुंब कायदा या विषयातील तज्ञ या परिसंवादात सहभागी झाले होते. ‘माय माईन्ड मॅटर्स’ च्या संस्थापक संचालक डॉ. अरुणा कुलकर्णी आणि ज्येष्ठ वकील वृषाली वैद्य यांनी दक्षिण कमांडचे अधिकारी आणि महिलांच्या या परिसंवादात आपले विचार व्यक्त केले.
एका परस्पर संवादात्मक सत्राच्या माध्यमातून उपस्थितांना बहुमूल्य संवाद कौशल्ये, वादाचे निराकरण करण्याची हातोटी आणि जोडप्यांमध्ये भक्कम, टिकून राहणारे नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर उपायांचे मार्गदर्शन मिळाले.
यावेळी बोलताना प्रादेशिक एडब्लूडब्लूएच्या पदसिद्ध अध्यक्ष सुबीना अरोरा यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि लष्करातील जोडप्यांना परस्परांपासून दीर्घ काळ दूर राहावे लागत असल्याने भेडसावणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या समस्या आणि जोडीदारांच्या वाढत्या आकांक्षांकडे लक्ष वेधले. या परिसंवादातून मिळालेले मार्गदर्शन आणि नातेसंबंध टिकवण्यासाठी अवलंब करावयाच्या पद्धतींच्या माहितीमुळे सुरुवातीच्या टप्प्यातच अनेक वादांचे निरसन करणे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
