लांजा-कुवे नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला; सेनेचे मनोहर बाईत झाले नगराध्यक्ष, आ. राजन साळवी ठरले किंगमेकर
रत्नागिरी: काल बुधवार दि.९ रोजी झालेल्या लांजा-कुवे नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर धनाजी बाईत यांनी ३५४६ मतं मिळवत काँग्रेसच्या राजेश रामचंद्र राणे यांचा ६१७ मतांनी पराभव केला. याठिकाणी अपक्ष संपदा योगेश वाघधरे यांना तिसऱ्या क्रमांकाची १५६३ मतं मिळाली तर भारतीय जनता पक्ष थेट चौथ्या स्थानी फेकला गेला. या निवडणुकीत शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी विजय मिळवत लांजा-कुवे नगरपंचायतीवर भगवा फडकवला.
निकाल लागताच केंद्रा बाहेर शिवसैनिकांनी एकंच जल्लोष केला. या प्रसंगी राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, संजय साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, शुभम साळवी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राजन साळवी यांना गत विधानसभा निवडणुकीपेक्षा कमी मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे या निवडणुकीवर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष होते. परंतु लांजा नगरपंचायत निवडणुकीत सेनेला बहुमत मिळाल्यामुळे राजन साळवींची मतदारसंघावरची पकड पुनः एकदा अधोरेखित झाली. या निवडणुकीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी शिवसेनेने महाशिवआघाडी म्हणून न लढता काँग्रेसशी फारकत घेत विरोधात निवडणूक लढवली.
ऍड. अनिल परब यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याझाल्या शिवसेनेने नगरपंचायत काबीज केल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक जोशात आहेत.
