हिवाळी अधिवेशन: शिवसेना-भाजप च्या आमदारांमध्ये झाली धक्काबुक्की
नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याची पाहायला मिळाली. आज अधिवेशन सुरू झाल्याझाल्या भाजपने शेतकऱ्यांना हेक्टरी २५,००० रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी करत गोंधळ घातला. यावेळी विरोधीपक्ष नेत्यांसह भाजप आमदार वेल मध्ये आले. यावेळी “मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांधावर आलो आहे – उद्धव ठाकरे” असा मजकूर लिहिलेले बॅनर विरोधकांनी झळकावले. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी पक्ष अशी दोन्हीबाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.
यादरम्यान शिवसेनेचे बुलढण्याचे आमदार संजय गायकवाड आणि लातूर जिल्हयातील औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात शेतकरी कर्जमाफीवरून धक्काबुक्की झाली. या वेळी शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजपच्या जेष्ठ सदस्यांनी आपापल्या सदस्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सत्ताधारी पक्षाने २ विधेयके मंजूर करून घेतली. यानंतर काहि काळासाठी विधिमंडळाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते.
