ब्रेकिंग न्युज: मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांची ११ मार्चला शिवसेनेत घरवापसी
मनसेचे एकमेव आमदार पूर्वाश्रमीचे शिवसैनिक शरद सोनवणे यांची सोमवार दिनांक ११ मार्च रोजी पुन्हा शिवसेनेत घरवापसी होत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. शिवसेना भवन येथे प्रचंड शक्तिप्रदर्शन करत ते उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नेमका आजच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १३वा वर्धापन दिन आहे आणि आजच ही खबर यावी हा योगायोग म्हणावा. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनंतर एकमेव आमदारही मनसे सोडून जात असल्याचे वृत्त पसरल्यामुळे मनसैनिकांत खळबळ उडाली आहे.
बरोबर ५ वर्षांपूर्वी २०१४ साली आमदार शरद सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेला सोडचिठी दिली होती. आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर जुन्नर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा ते जवळपास १५,००० मतांनी निवडून आले होते. त्या निवडणुकीत मनसेचे विद्यमान सर्व आमदार पराजित झाले फक्त आ. सोनवणे हे एकमेव उमेदवार निवडून आले होते. आ. शरद सोनवणे तसे मनसेत असून कधी मनसेच्या व्यासपीठावर दिसलेच नाहीत. खासगीत त्यांचे निकटवर्तीय म्हणतात की ते मनाने अजून शिवसेनेत आहेत. मनसे साठी हा मोठा धक्का मनाला जातोय.
