देशात दुसरा मोदी तयार होऊ नये याची काळजी घेतोय – पवार
दौंड: मी माझं बोट कोणाला धरू देत नाही; कारण आता दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये म्हणून मी ही काळजी घेतोय, असा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
नरेंद्र मोदींनी आपण शरद पवार यांची करंगळी पकडून राजकारणात आलो असे विधान बारामतीत केले होते. त्याच वक्तव्याचा आधार घेत शरद पवारांनी म्हटलं की, ‘मी माझं बोट आता कोणाला धरु देत नाही. दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये म्हणून मी ही काळजी घेत आहे’. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी दौंड तालुक्यात सभेचं आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं.
माझं बोट धरून राजकारणात येणार्या मोदींनी वर्ध्याच्या सभेत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका केली. पवार कुटुंबात भांडणे आहेत, असे ते म्हणाले. राजकारणात वैयक्तिक टीका करू नये, हा नियम आहे. मला दिल्लीत मोदी भेटल्यावर त्यांना मी विचारीन की, माझ्या घरात भांडणे आहेत, हे तुम्हाला कसे कळले. माझं घर भरलेलं आहे; तुमचं घर कसं आहे. ते सांगा.
‘मोदी तुम्ही माझ्या घराची चिंता करू नका, मला एक मुलगी आहे. तिचेही लग्न झाले आहे. ती स्वतंत्र राहते. माझा संसारही व्यवस्थित चालू आहे. मोदींना स्वतःचा संसार करता आला नाही, ते दुसऱ्यांच्या घराबाबत काय बोलत आहेत. त्यामुळे मोदींचे वागणे बरे नव्हे,’ अशा शब्दांत पवार यांनी मोदींना खडेबोल सुनावले.
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने देशातील जनतेला अनेक आश्वासने दिली. पण ही आश्वासन पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा विरोधात अनेक ठिकाणी प्रचंड राग पाहण्यास मिळत आहे. तर ज्या ज्या वेळी देशात भाजपचे सरकार आले, तेव्हा देशावर हल्ले झाले आहेत,’ अशा शब्दात पवार यांनी भाजपावर जोरदार टीका केली.
