या बाबतचा निर्णय शासन लवकरच घेणार असल्याची वनमंत्री गणेश नाईक यांची विधानपरिषदेत माहिती
मुंबई, दि. १० : संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, यासंदर्भात लवकरच सर्वंकष निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री नाईक म्हणाले की, नॅशनल पार्क परिसरातील अतिक्रमणधारकांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला ११ हजार ३५९ अतिक्रमणधारकांचे दावे तपासण्यात आले असून त्यापैकी २९९ जण पात्र ठरले आहेत; मात्र त्यांचे पुनर्वसन प्रलंबित आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ हजार ४८६ अतिक्रमणधारकांच्या प्रश्नांवर विचार सुरू आहे. आरे कॉलनी परिसरातील सुमारे २० एकर जागेत आदिवासी कुटुंबांसाठी ‘ग्राउंड प्लस वन’ स्वरूपातील घरे बांधून सुमारे २,२०० कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
नॅशनल पार्कबाहेरील वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे आदी मूलभूत सुविधा दुरुस्त करण्यास कोणताही अडथळा आणू नये, असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात येतील, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले. यावेळी सदस्य अनिल परब, चित्रा वाघ, राजेश राठोड व मनिषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
