“माझ्यासोबत जे घडलं ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मला पुर्ण हक्क आहे” : साध्वी प्रज्ञा सिंग
भोपाळ : भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी दोन दिवसांपूर्वी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानावरून देशभरातून सर्वच क्षेत्रातील लोकांनी निषेध नोंदवला. या बाबतची तक्रार जेव्हा निवडणूक आयोगाकडे आली तेव्हा तक्रारीची दखल घेत त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांना तत्काळ स्पष्टीकरण देण्याची नोटीस धाडली. या नोटीसीला त्यांनी आज उत्तर देताना बचावात्मक पवित्रा घेतला. त्या म्हणाल्यात की , “कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल मी काहीच टिप्पणी केलेली नाहीये. मी माझ्या भाषणात कोणाही हुतात्म्याच्या हौतात्म्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेले नाहीये. एका वाक्यावरून माझ्या वक्तव्याचा विपर्यास नाही केला पाहिजे. मी माझ्या मनोगतात तत्कालीन काँग्रेस सरकारच्या निर्देशानुसार माझ्यावर झालेल्या यतानांचा उल्लेख तेवढा केला होता. आणि माझ्यासोबत जे घडलं ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मला पुर्ण हक्क आहे.” पुढे त्यांनी या साऱ्याचे खापर माध्यमांवर फोडले आहे. एकूणच साध्वी प्रज्ञा यांनी निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण देताना या प्रकरणी मी जनभावनेचा आदर राखत माझे वक्तव्य मागे घेतले आहे असा उल्लेख केला आहे.
आता या प्रकरणावर पडदा पडतो की अजून कोणत्या अग्निपरिक्षेतून साध्वी प्रज्ञांना जावे लागते ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. अशातच काल ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी साधवींची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली आहे.
