“दाऊद ला भारतात आणण्याच्या वचनाचं काय झालं?” सचिन अहिर यांचा भाजपला सवाल
मुंबई: दोन दिवसांपूर्वी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला. यानंतर आरे वाचवा मोहिमेतील कार्यकर्त्यांनी व पर्यावरण प्रेमींकडून या निर्णयाच स्वागत करण्यात आलं.
पण विरोधकांनी विशेष करून भाजपने या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. भाजपचे मुंबई सरचिटणीस मोहित भारतीय यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर खोचक टीका करत म्हटलंय की, “सूत्र: लवकरच दाऊद चे सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार आहे व त्याला क्लीनचिट मिळणार असल्याचे कळते. सध्या गुन्हे मागे घेण्याचा ऋतू चालू आहे …
त्वरा करा कमी दिवस बाकी आहेत” या ट्विट नंतर भारतीय यांना अनेक जणांनी ट्रोल केले. यानंतर भारतीय यांनी देवेंद्र फडणवीस यांची वाहवा करत अनेक कामांचे श्रेय त्यांना देत आणखि एक असेच ट्विट केले.
या ट्विट वर आपली प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते सचिन अहिर यांनी भारतीय यांना भाजपने दाऊद ला भारतात आणण्याच्या दिलेल्या आश्वासनाबाबत प्रश्न विचारला आहे. अहिर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “तर मोहित भारतीय आता एका दुःखी पराभूतासारखं वागत आहेत जसं भाजप करतेय. जेव्हा शिवसेना तुमच्यासोबत युतीत होती तेव्हा तुम्ही त्यांना काम करू दिलं नाहीत आणि आता ते काही कृती करत आहेत तर तुम्ही काम करायला देत नाही आहात. बाकी भाजपने दाऊद ला भारतात परत आणण्याचे आश्वासन दिले होते त्याबाबत काही ताजी माहिती आहे का?”
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1201747544365289473?s=19
कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी विरोधी आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या धडक कृतीमुळे रिफायनरी प्रकल्प पुन्हा नाणार ला आणण्याची भाजपची स्वप्न धुळीस मिळाली आहेत. येत्या काही दिवसात असेच कोल्ड वॉर शिवसेना आणि भाजपमध्ये पाहायला मिळेल इतकं नक्की.
