वाचा विशेष : राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली ‘या’ प्रश्नांची उत्तरं
सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा झंझावात जोरात चालू आहे. काल सायंकाळी पुण्यातील सिंहगड रोड येथे त्यांची एक विराट सभा झाली. गेल्या सभेप्रमाणे या सभेतही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप वर टीकेची झोड उठवली. या प्रसंगी त्यांनी पुढील प्रश्न पंतप्रधान मोदींना उद्देशून विचारले.
- काल त्यांनी माढ्यात कहर केला, त्यांनी स्वतःची जात काढून दाखवली. ते म्हणाले मी खालच्या जातीतला आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत. मग गेल्या ५ वर्षात दलितांना मारहाण झाली तेंव्हा तुम्ही गप्प का होता. मोदींच्या गुजरात मध्ये, उना मध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेंव्हा ते गप्प का होते?
- उना मध्ये गाय मारली नव्हती तर, गाय गेल्यावर त्यांची कातडी काढायला ज्यांना बोलावलं, त्यांना गोरक्षकांनी मारहाण केली. पण गो-हत्येवर मोदींची जर अशी तीव्र भूमिका असेल तर मग माझे अनेक जैन मित्र बीफ एक्स्पोर्ट मध्ये आहेत असं तुम्हीच सांगत होतात ना? मग नेमकी तुमची भूमिका काय?
- जर बीफ निर्यात करणारे तुमचे मित्र असू शकतात तर मग गो-हत्येच्या नावावर ५०, ६० लोकं मारले गेले तेंव्हा तुम्ही का गप्प बसलात?
- तुम्ही काहीतरी वेगळं करणार म्हणून तुम्हाला सत्ता दिली, पण तुम्ही सत्तेत आल्यावर आधी पेक्षा देश रसातळाला गेला. देश पाण्यासाठी तडफडतोय, तरुणांना नोकऱ्या हव्यात आणि अशा वेळेला तुम्ही पुतळ्यांवर ४००० कोटी खर्च करत होतात. ह्या देशाला खरंच पुतळ्यांची गरज आहे का?
- डोकलामच्या वेळेला असं वातावरण निर्माण केलं की कधीही युद्ध होईल, मग चीनवर,चीनच्या वस्तूंवर बंदी आणा, मग एवढं होतं तर मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधून का बनवून आणला?
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अट्टहास का? बरं ह्यावर मोदी म्हणाले होते की मुंबई-पुणे बुलेट ट्रेन काय कामाची? बिझनेससाठी अहमदाबादलाच जावं लागतं. पुण्यात जायचं असेल तर फक्त शिक्षणासाठी. बरं तुमचं असं मत असेल तर मला सांगा गुजराती बांधवांना व्यापारासाठी महाराष्ट्रात का यावंसं वाटतंय?
- जे जे राष्ट्राध्यक्ष आले त्यांचं त्यांचं स्वागत मोदींनी गुजरात मध्ये का केलं? त्यांना फक्त गुजरातमध्येच का नेता? देशातील इतर शहरात का नाही नेलं? मोदी तुम्ही एवढे जगभर फिरलात, काय साध्य केलं तुमच्या परदेश दौऱ्यानी? काय मिळालं देशाला?
- स्वच्छ भारतच्या नावाखाली इतका कर गोळा केलात, कुठे आहे तो पैसा? खरंच भारत स्वच्छ झाला का? त्या रामदेव बाबांच्या नादी लागून योगा दिवस साजरा केला? हे बाबा आहेत कुठे? त्यांचा व्यवसाय ५ वर्षात इतका कसा फोफावला?
- जगातलं सगळ्यात आलिशान असं राजकीय पक्षाचं कार्यालय भारतीय जनता पक्षाने दिल्लीत सत्तेत आल्यावर उभारलं, त्यासाठी पैसे कुठून आणले?
