ईडी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीला सुरुवात
मुंबई: कोहिनूर मिल प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज दि. २२ रोजी ई.डी.(सक्तवसुली संचालनालय) च्या मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याची नोटीस मिळाली होती. त्यानुसार आज राज ठाकरे आपल्या पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, पुत्र अमित आणि सून मिताली सह ईडी च्या कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडी कार्यालयातील चौकशीच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांकडून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले आहेत. तसेच मुंबईत मोक्याच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काही बेस्ट बसेसना लोखंडी जाळ्याही लावण्यात आलेल्या आहेत. मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ईडी ची नोटीस आल्यानंतर मनसे ने आधी कार्यकर्ते राज ठाकरे यांच्यासोबत कार्यालयापर्यंत येणार असल्याचे जाहीर केले होते. पण नंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केले की कोणीही कार्यालयाजवळ फिरकू नये.
