मनसे निवडणूक लढवत नाही, तरीही भाजपवाले आम्हाला घाबरतात: राज ठाकरे
इचलकरंजी: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसे निवडणूक लढवणार नाही, परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांविरुद्ध प्रचार करणार असल्याने भाजपवाले घाबरत आहेत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली. कोल्हापुरातील इचलकरंजी इथल्या जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते.
२०१४ मध्ये लोकांना अच्छे दिनचं स्वप्न दाखवणारे, आश्वासनं देणारे मोदी आज कशालाच बांधील नाहीत. मोदी जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत. गेल्या निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांवलर बोलत नाही. आता फक्त पाकिस्तान-पाकिस्तान सुरू आहे. आमचे जवान सीमेवर हकनाक शहीद होतात. मात्र त्याचं यांना काहीही सोयरसुतक नाही. यांना फक्त जवानांवरुन राजकारण करायचं आहे, अशा शब्दांमध्ये राज यांनी पंतप्रधानांवर तोफ डागली.
एअर स्ट्राइकवरुन मोदी राजकारण करतात. पाकिस्तानला धडा शिकवल्याचं म्हणतात. मग पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान आम्हाला पुन्हा मोदीच पंतप्रधानपदी हवा, असं कसं काय म्हणतो, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मोदींच्या सत्ताकाळात सर्वाधिक जवान शहीद झाल्याचा दावा त्यांनी केला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाकिस्तानला लव्ह लेटर लिहिणं बंद करा म्हणणारे, त्यांनी एक मारला तर त्यांचे चार मारा म्हणणारे मोदी पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधी सोहळ्याला कसे बोलावतात? वाट वाकडी करुन अचानक शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना केक भरवायला कसे काय जातात? त्यांच्याकडे बिर्याणी कशी खातात? असे प्रश्न राज यांनी विचारले. मोदी हे सर्व करत असताना शहीद जवानांच्या कुटुंबांना काय वाटलं असेल, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
विकासाचा कोणताच मुद्दा उरला नसल्याने शहीद जवानांच्या नावावर भाजप मते मागत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे देशाला कलंक आहेत. हुकूमशाही पद्धतीने देश चालविण्याचा त्यांचा डाव असून, लोकशाही संपविण्याची भाषा करणाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे,’ असे आवाहन करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकदा फसलात, पुन्हा फसू नका, असा सल्लाही दिला.
स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत एका आठवड्यात ८ लाख ५० हजार शौचालये बांधली, असा दावा मोदींनी बिहारमध्ये केला होता. एका आठवड्यात ८ लाख ५० हजार शौचालये म्हणजे एका मिनिटात ८४ शौचालये आणि ५ सेकंदात ७ शौचालये बांधली जातील. हा विक्रमच म्हणायला हवा. इतक्या वेळात होत पण नाही, तितक्या वेळात यांनी शौचालये बांधली, असा टोला राज यांनी लगावला.
