Mumbai_Suburban_Railway-Web
पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर हाय अलर्ट, मोठ्या हल्ल्याची शक्यता
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात दुसरा मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेकडून वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, अहमदाबाद, राजकोट या रेल्वे स्थानकांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर, महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या तीन राज्यांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणामध्ये वाढ करण्यात आली आहे.
चर्चगेटमधील महानिरीक्षक कार्यालयाने २२ फेब्रुवारीला मुंबई, अहमदाबाद, राजकोट, भावनगर, वडोदरा आणि रतलाम येथील आरपीएफ प्रमुखांना पत्र पाठवले आहे. पत्रात सांगण्यात आले आहे की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणांनी सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले जातील अशी माहिती दिली आहे. यामध्ये रेल्वे स्थानक, मंदिर, हॉस्पिटल किंवा शाळा इत्यादींना टार्गेट केले जाऊ शकते, असे म्हटले आहे. जम्मू काश्मीरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या ट्रेनवर करडी नजर ठेवली जात आहे.
