Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष

१६४ मतं मिळवून झाले विजयी

मुंबई, दि. ३ : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर आज विजयी झाले. भाजपा, एकनाथ शिंदे गटातले आमदार, बहुजन विकास आघाडी, मनसे आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनाच्या विधानसभा सदस्यांनी नार्वेकर यांना मतदान केलं. त्यांना एकूण १६४ मतं मिळाली. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटातले आमदार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या १०७ आमदारांनी मतदान केलं. समाजवादी पक्ष आणि AIMIM पक्षाच्या आमदारांनी निवडणुकीत मतदान केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, भाजपाचे २, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, MIM चे एक आमदार सभागृहात मतदानावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळं १६४ सदस्यांची मतं मिळवून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याची घोषणा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी नार्वेकर यांना सन्मानानं अध्यक्षांच्या खुर्चीकडे नेलं.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षांचं अभिनंदन केलं. आपण निःपक्षपाती काम कराल आणि तरुणांना, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाधिक प्राधान्य द्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशात आतापर्यंत लोक विरोधी पक्षातून सत्तेत जात होते. आम्ही ८-९ मंत्र्यांसह सत्तेतून बाहेर निघालो, देशात पहिल्यांदाच असं घडलं असेल, असं शिंदे म्हणाले. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. मी कुणालाही जोर जबरदस्तीनं अडवून ठेवलं नाही, असा दावा शिंदे यांनी यावेळी केला. नार्वेकर हे देशातले आणि राज्यातले सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे नार्वेकर यांचे सासरे आहेत. हा दुर्मिळ योगायोग असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *