राहुल गांधींनी स्वीकारला राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा
अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा सोपवला होता. अखेर काल(गुरुवारी) राहुल गांधी यांनी विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राधाकृष्ण विखें पाटील यांच्यासोबत अहमदनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांचाही राजीनामा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्वीकारला असून नगरमध्ये पूर्ण जिल्हा समिती बरखास्त केल्याचेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी मोठ्या दिमाखात भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखेंच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळेच विखेंनी पक्षश्रेष्ठींकडे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राहुल गांधींनी आज तो स्वीकारल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
