radhakrishna Vikhe Patil
विखेंकडून पुत्र सुजयचा उघड प्रचार, काँग्रेस कारवाई करणार का? राष्ट्रवादीचा सवाल
अहमदनगर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार व त्यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई करणार की नाही, अशी लेखी तक्रार राष्ट्रवादीचे नगर जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.
आघाडीच्या वतीने नगरमध्ये संग्राम जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र विखे पाटील हे विरोधी पक्षाचे सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत. हा गंभीर प्रकार असून यावर कारवाई करणार की नाही, असा सवाल काकडे यांनी पत्रातून केला आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणूकीत युतीचा उमेदवार निवडून येईल असे विखे प्रसार माध्यमांसमोर सांगत आहेत. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नगर जिल्ह्याचा समन्वयक म्हणून मी विखेंवर कारवाईची मागणी करत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये होणाऱ्या सभेत विखे प्रवेश करण्याची शक्यता आहे.
