वाचा मुंबईतील पवई पोलीस स्थानकातील पीएसआय माधुरी झेंडगे-कोकाटे यांची कोरोनामुक्तीची कहाणी ब्लॉगर कविता ननवरे यांच्या लेखणीतून
माझ्यासाहित कित्येकांनी हा संपूर्ण कोरोनाकाळ घरात नवनवे पदार्थ बनवून खात अक्षरशः लोळून काढलाय. नाही म्हटलं तरी काळजी चिंता होतीच. हा लॉकडाउन कुठेतरी सुखाची पर्वणी वाटली आपल्याला. पण अत्यावश्यक सेवेतील मंडळींना कुठला आलाय आराम. त्यांना दिवस उगवला की कर्तव्यतत्पर व्हावं लागायचं. त्यात वैद्यकीय आणि पोलीस सेवेतील व्यक्तींना जणू रोज लढाईलाच उभा राहावं लागायचं.
माझी वहिनी( मावस भावाची बायको) माधुरी झेंडगे- कोकाटे पवई पोलीस स्टेशनला पी.एस.आय.आहे. भाऊ Jaywant Kokate , वहिनी, दोन वर्षांचं छोटं बाळ आणि माझी मावशी असे चौघेजण अंधेरीला राहतात. मुंबईत कोरोनाचा कहर सुरू झाला आणि वाहिनीने मावशील आणि भावाला विश्वासात घेऊन त्या तिघांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला भाऊ आणि मावशी वहिनीच्या या निर्णयाशी अजिबात सहमत नव्हते पण ‘ माझ्यामुळे तुम्हां तिघांच्या जीवाला धोका नको’ म्हणत तिने आपल्या नवऱ्याला व सासूला समजावले. शेवटी दोघेही तयार झाले. ते ज्या बिल्डिंग मध्ये राहतात त्याच बिल्डिंगमध्ये त्याच मजल्यावर एक फ्लॅट रिकामा होता. वाहिनीने अनिश्चित काळासाठी आपला मुक्काम त्या फ्लॅटमध्ये हलवला. कुणालाच माहीत नव्हतं आता दोन वर्षांच्या बाळाला सोडून त्याची आई आणि बाळही आईविना कसं राहणार होतं?
वहिनीला रोज ड्युटी ला जाताना बाळ दिसायचं. आपल्याच बाळाला असं परक्यासारखं बघताना तिला कसं वाटत असेल याची कल्पना ही करवत नाही. बाळाचं लक्ष नसताना वहिनी बाळाला लांबून बघत राहायची. ती मनात असूनही स्वतःच्या बाळाला जवळ घेऊ शकत नव्हती. बाळ बोबड्या बोलात आईआई म्हणायचं, आईची आठवण काढायचं तेंव्हा त्याला आई व्हिडीओ कॉल वर बोलायची. बाळ आनंदानं उड्या मारायचं. काही क्षणांसाठी तरी दोघांमधला विरह व्हर्चुअली संपायचा.
१२ मे ला बाळाचा दुसरा वाढदिवस होता. त्या दिवशीही आई आपल्या बाळाला व्हिडीओ कॉल वरच भेटली. मोह टाळला. अनेकांनी वहिणीचं कौतुक केलं. ‘ कर्तव्य आधी कुटुंब नंतर ‘ अशी एक दोन पेपरला कुनीकुणी स्टोरी ही केली. वाहिनीचा फोटो घेण्यासाठी पत्रकारांना खूप विनंती करावी लागली. वहिनी म्हणायची मी काही वेगळं करत नाही. माझ्यासारखी हजारो लोकं आहेत. आमच्यापेक्षा कुणाचं जास्त कौतुक करायचं असेल तर ते वैद्यकीय सेवेतील योद्ध्यांचं करा. काही टीव्ही चॅनल नि विचारलं तेंव्हा ही तिने नकारच दिला होता. तिच्या दृष्टीने ही खूप सामान्य गोष्ट होती.
एकदोनतीनचार आठवडे गेले. महिना दीड महिना संपला. ड्युटी वरून येतानाच वहिनी घरातील अत्यावश्यक सामान भाजीपाला सगळं घेऊन यायची. तिच्या फ्लॅट मध्ये ठेवायची. दोन तीन दिवसांनी भाऊ आपल्या घरात ते घेऊन यायचा. आणलेलं सामान धुणे, सॅनिटाइझ करणे सगळी काळजी घेतली जायची. मावशी सकाळ संध्याकाळचं जेवण चहा पोहच करायची. वहिनी ऑफिस मधला चहा ही घ्यायची नाही. स्वतः रोज ड्युटी वरून आलं की गरम पाण्यात कपडे घालणे, अंघोळ करणे. ऑफिस मध्ये ही कुणाला स्पर्श होणार नाही हे कटाक्षाने टाळणे. सगळं केलं. कुठून कसा कोरोना आपण सोबत घेऊन येऊ आणि नकळत का होईना घरातल्या लहान बाळाला आणि आपल्या साठ वर्षाच्या सासूला काही व्हायला नको म्हणून वाहिनीने होता होईल तेवढं कोरोनाला दूर ठेवलं.
आणि एक दिवस भावाचं अंग गरम झालं. दुखायला लागलं. बाळाला आणि वाहिनीलाही सेम लक्षणं. संशय बळावला. न घाबरता कोविड ची टेस्ट करायचं ठरवलं. मावशीला कसलीच लक्षणं नव्हती पण तिची ही टेस्ट करणं भाग होतं. चौघांच्या टेस्ट झाल्या. वहिनी बाळ आणि भावाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि आश्चर्यकारकपणे मावशीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तिघांना दवाखान्यात जाऊन ऍडमिट व्हायचं होतं आणि मावशीला एकटीला घरात राहायचं होतं. तिघांची लक्षणं फार सिरीयस नव्हती त्यामुळं फार कुणी घाबरलं नाही. आपल्याला दवाखान्यात जाऊन उपचार घ्यायचे आहेत आणि बरं होऊन परत यायचं आहे हेच डोक्यात होतं. त्या तिघांची तर कसोटी होतीच पण सगळ्याना जास्त काळजी होती ती मावशीची. सात बहिणींमध्ये सगळ्यात भित्री बहीण. दोन वर्ष झालं मुंबईत राहतेय याचंच सगळे आश्चर्य करायचे. आता तर बंदिस्त घरात काही दिवस एकटी राहणार होती.
भाऊ वहिनी दिवसातून शंभर वेळा मावशील फोन करायचे. नीट खा पी काळजी घे. काळजी करू नको. अशा सूचना देत राहायचे. मावशील टीव्ही बघायला फार काही आवडत नाही आणि जास्त झोपायलाही. कायतरी करून चार घास खाणे आणि फोनवर बोलणे. घरातल्या तीन माणसांची निगेटिव्ह होऊन परतायची वाट बघणे एवढंच मावशीच्या हातात होतं. त्या दिवसांत माझं वाहिनीशी नाही पण मावशीशी दोनदा बोलनं झालं पण मावशी एका शब्दानेही काही बोलली नाही. वहिनी कुठाय तर ड्युटी वर गेलीय. बापलेक कुठं आहेत तर झोपलेत असं खोटं सांगायची. बाळ तर आई जवळ आपण आहोत यानेच खुश होतं. त्याचं फार काही कळायचं वयच नाही. बाकी या तिघांनी आम्हां कुणालाच कसलाच संशय येऊ दिला नाही. आम्हां सगळ्यांना कळलं तर नको तितकी काळजी करत बसतील बरे झाल्यावर सांगू असंच ठरवलं होतं.
वहिनी-भाऊ-बाळ आठ दिवसांनी व्यवस्थित उपचार घेऊन कोरोनावर मात करून घरी परतले. आणि त्यानंतर चार दिवसांनी आम्हां सगळ्यांना कळवलं. एकाचवेळी दुःख आणि सुख काय असतं ते आम्ही त्यावेळी अनुभवलं. कधी नव्हे ते मी त्या क्षणी देवाला हात जोडले.
पोलिस सेवेत असताना आपलं कर्तव्य सोडून त्याच्याकडे पाठ फिरवून कसं चालेल तरी मी वहिनीला म्हणाले ‘वहिनी आता लवकर ड्युटी वर हजर होऊ नका. पुष्कळ आराम करा. बाळाला वेळ द्या. ‘वहिनीने हो हो केलं. आता नाही जाणार लवकर असं हसत हसत कबूल केलं.
आणि काल पुन्हा ही रणरागिणी कोरोनावर मात करून निर्भीडपणे आपल्या सेवेत रुजू झालीय. पोलीस स्टेशनमध्ये फुलं उधळून तिचं स्वागत करण्यात आलं.
वहिनी आम्हांला तुमचा अभिमान वाटतो.
– कविता ननवरे
