डॉ. भारती पवार, प्रवीण छेडांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार व मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीने भारती पवार यांना डावलून धनराज महालेंना दिंडोरीतून लोकसभेचे तिकीट दिले आहे. त्यामुळे भारती पवार राष्ट्रवादीवर नाराज होत्या.भाजपकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्यांनाच उमेदावरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट होणार असल्याचे सांगितले जात आहे.
किरीट सोमय्या यांच्याऐवजी प्रवीण छेडा यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न भाजप करणार असल्याची चर्चा आहे. प्रवीण छेडा हे आधी भाजपमध्येच होते. परंतु, प्रकाश मेहता यांच्यासोबतच्या मतभेदामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
