प्रमोदजींचं एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे ते सतत लोकांशी स्वत:ला जोडून ठेवायचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : अक्षय कुमारने मोदींची पहिली अराजकीय मुलाखत घेतली. या मुलाखतीत मोदींच्या जीवनातील अनेक अज्ञात पैलू समोर आले आहेत.
अक्षयने नरेंद्र मोदींना राजकारणापलीकडील मैत्रीबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “अनेक विरोधी पक्ष नेते माझे चांगले मित्र आहेत. ममता बॅनर्जी अजूनही दरवर्षी मला कुर्ते पाठवतात. ते कुर्ते त्यांनी स्वत: निवडलेले असतात. तर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मला वर्षातून तीन-चारदा बंगाली मिठाई पाठवतात. हे पाहून ममता बॅनर्जींनीही मला मिठाई पाठवण्यास सुरुवात केली आहे.” विरोधकांमधील अनेक नेत्यांसोबत आपले चांगले संबंध असल्याचं मोदी या मुलाखतीमध्ये म्हणाले.
‘तुम्ही फक्त ३ ते ४ तासच का झोपता?,’ असा प्रश्न अक्षयने विचारला. यावर मोदी म्हणाले, ‘मला अनेकजण हा प्रश्न विचारतात. इतकंच नव्हे तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीसुद्धा मला झोपेविषयी प्रश्न विचारला होता. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. एकमेकांशी एकेरी भाषेतच आम्ही बोलतो. इतके कमी तास झोपून तू स्वत:चं नुकसान करतोयस असं ते म्हणायचे. पण माझ्या शरीराला तशी सवयच खूप आधीपासूनच लागली आहे. ३ ते ४ तासांत माझी झोप पूर्ण होते.
अक्षयने निवृत्तीनंतर तुमचा प्लॅन काय असेल असा प्रश्न विचारला. ‘मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. एकदा अटलजी, अडवाणीजी, प्रमोद महाजन यांच्यासोबत एक बैठक होती. या बैठकीत सर्वांत कमी वयाचा मीच होतो. बैठक सुरू होण्यापूर्वी सगळे मिळून सहज गप्पा मारत होतो, चर्चा करत होतो. निवृत्तीनंतर काय करणार याबाबत सगळेजण आपापले विचार सांगत होते. प्रमोदजींचं एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे ते सतत लोकांशी स्वत:ला जोडून ठेवायचे. मला विचारलं तर मी म्हणालो, मला यातलं काही जमतंच नाही. मी कधी याबद्दल विचारच केला नाही. ज्या ज्या वेळी माझ्यावर जी काही जबाबदारी आली, त्यालाच मी आयुष्य मानलंय. स्वत:ला गुंतवून ठेवण्यासाठी काही करावं लागेल याची मी कल्पनाच केली नाही. म्हणूनच माझ्या मनात कधी निवृत्तीविषयी विचार आला किंवा मी कधी त्याबद्दल विचारच करत नाही. पण आयुष्याचा प्रत्येक क्षण कोणत्या ना कोणत्या सदकार्यातच घालवेन यावर मला पूर्ण विश्वास आहे,’ असं मोदींनी सांगितलं.
या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सांगितल्या.
