“मी भगवंताजवळ काहीच मागत नाही” : पंतप्रधान नरेंद्र मोदी
केदारनाथ: केदारनाथ जवळील एका गुहेत जवळपास १७ तास ध्यान-धारणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी सकाळी पुनः एकदा केदारनाथ मंदिरात पूजा-अर्चा केली. यानंतर ते म्हणाले की सर्वात आधी मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो की दोन दिवसांचा आराम मिळाला. गुहेत एकांतवासाची संधी मिळाली. पंतप्रधान पुढे म्हणाले की मी जेव्हा भगवंताच्या चरणी येतो तेव्हा त्याच्याकडे काहीच मागत नाही. मी मागण्याच्या प्रवृत्तीशी सहमत नाही कारण त्यांनी मला देण्यायोग्य बनवलं आहे.
नरेंद्र मोदी सकाळी गुहेच्या बाहेर आल्यावर छडी च्या साहाय्याने ओबडधोबड डोंगर चढून केदारनाथ मंदिरात पोहोचले. या दरम्यान वाटेत त्यांनी बर्फाने झाकलेल्या डोंगररांगांचा नजारा पाहिला तसेच काही क्षण मंदाकिनी नदीच्या किनारी एका दगडावर थोडावेळ, वेळ व्यतीत केला. मंदिरात पोहोचल्यावर त्यांनी शंकराची पूजा करून जलाभिषेक केला.
उच्च गढवाल हिमालयी क्षेत्रात ११,७५५ फूट उंचीवर केदारनाथ मंदिर वसलेले आहे.
