पेंच परिसरात वाघ-बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘AI’ तंत्रज्ञानाचा वापर
पेंच वन्यजीव क्षेत्रातील ४० ठिकाणचे अलर्टस् मिळणार
नागपूर, दि. १३ : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार परिसर हा आदिवासीबहुल भाग असून तो पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पंचक्रोशीत येतो. या परिसरातील पिपरिया हे छोटे गाव वाघांच्या हालचालींसाठी ओळखले जाते. वाघांच्या डरकाळ्या आणि त्यांच्या संचारामुळे गावकऱ्यांना वारंवार धोका निर्माण होत असल्याने आता नागपूर ग्रामीण पोलीस आणि वन विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेमुळे गावकऱ्यांना वाघ किंवा बिबट्यांचा वावर असल्याचे मोबाईलवर तात्काळ इशारे मिळू लागले आहेत.
गुरुवारी रात्री या तंत्रज्ञानामुळे देवलापारजवळील पिपरिया येथे वाघ फिरत असल्याचा सतर्कतेचा संदेश गावकरी आणि वन विभागाला मिळाला. त्यामुळे संभाव्य धोका टळण्यास मदत झाली आणि ग्रामस्थांनी वेळीच खबरदारी घेतली.
१५ एप्रिलपर्यंत ४० गावांमध्ये यंत्रणा
वन विभागाच्या माहितीनुसार, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव क्षेत्रासह प्रादेशिक वनक्षेत्रातील एकूण ४० संवेदनशील गावांमध्ये १५ एप्रिलपर्यंत ही AI आधारित यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या तीन ठिकाणी ही प्रणाली सुरू झाली असून टप्प्याटप्प्याने इतर गावांमध्येही ती कार्यान्वित केली जाणार आहे.
तीन वर्षांत १५ मृत्यू; तणाव वाढला
नागपूर ग्रामीण भागात गेल्या अडीच ते तीन वर्षांत वाघ किंवा बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये १५ ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. अनेक वेळा या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वन विभाग आणि पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने हा धोका कमी करण्याचा निर्णय घेतला.
‘बायो-अॅक्यूस्टिक्स’ आणि ‘बायो-व्हिज्युअल’ प्रणाली
या प्रकल्पासाठी ‘मार्व्हल’ या संस्थेच्या मदतीने अत्याधुनिक कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली बसविण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही यंत्रणा दोन प्रकारे काम करते.
-
बायो-अॅक्यूस्टिक्स (ध्वनी आधारित प्रणाली) –
जंगलातील चितळ, सांबर, माकड किंवा मोर यांसारखे प्राणी वाघ किंवा बिबट्याचा वावर झाल्यावर विशिष्ट प्रकारचे आवाज काढतात. AI प्रणाली हे आवाज ओळखून त्याचे विश्लेषण करते आणि संभाव्य धोक्याचा इशारा पाठवते. -
बायो-व्हिज्युअल प्रणाली –
जंगल परिसरात बसविण्यात आलेले उच्च क्षमतेचे कॅमेरे प्राण्यांचे फोटो किंवा व्हिडिओ टिपतात. त्यावर AI आधारित सॉफ्टवेअर विश्लेषण करून वाघ, बिबट्या किंवा अस्वल यांसारखा प्राणी आढळल्यास त्वरित सतर्कतेचा संदेश पाठवते.
हे संदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच संबंधित गावांतील ग्रामस्थांना मोबाईल फोनवर मिळतात.
खापा आणि पारशिवनी परिसरातही विस्तार
वन विभागाच्या मदतीने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ४० ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. सध्या देवलापार परिसरासह खापा आणि पारशिवनी भागातही ही यंत्रणा कार्यान्वित होत आहे. मागील चार दिवसांत दोन वेळा वाघ आणि बिबट्यांच्या हालचालींबाबत या प्रणालीने सतर्कतेचे संदेश पाठवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
इतर व्याघ्र प्रकल्पांमध्येही योजना
या प्रयोगाला यश मिळाल्यास ही प्रणाली राज्यातील इतर व्याघ्र प्रकल्पांमध्येही लागू करण्याची तयारी सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प येथेही अशी AI आधारित यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव आहे. या संदर्भात वन विभाग आणि मार्व्हल संस्थेमध्ये सामंजस्य करार झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
मानवी जीवितहानी टाळण्याचा प्रयत्न
वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाजवळ असलेल्या गावांमध्ये मानव–वन्यजीव संघर्ष वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत AI आधारित सतर्कता प्रणालीमुळे वेळेआधी इशारा मिळून ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मानवी जीवितहानी टाळण्यास आणि वन्यजीव संरक्षणालाही मदत होणार असल्याचे वन विभागाचे मत आहे.
