राष्ट्रवादीकडून माढ्यातुन संजय शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
पंढरपूर: अखेर माढयाचा प्रश्न निकाली लावण्यास राष्ट्रवादीला यश आले आहे. माढ्यातून संजय शिंदे यांना तर उस्मानाबादमधून बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. संजय शिंदे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.
माढा मतदारसंघातून शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार होते. मात्र एकाच कुटुंबातून अनेक सदस्य नको यामुळे पवार यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भाजप समर्थनाने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या संजय शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
शरद पवार यांची बारामतीमधल्या गोविंदबाग या निवासस्थानी आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यात शरद पवार माढ्यातील उमेदवाराची घोषणा करतील असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
