मोदीजी, तुम्ही तर आमच्या राष्ट्रवादाला घाबरता – नवाब मलिक
मुंबई: अहमदनगरमधील भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नगरमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद एक निव्वळ दिखावा आहे, असे म्हटले होते. मोदींच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीने आज पलटवार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद काढता परंतु मोदीजी याच राष्ट्रवादाला तर तुम्ही घाबरत आहात, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींना प्रतिउत्तर दिले आहे.
नवाब मलिक म्हणाले, तुमचा राष्ट्रवाद हा हेडगेवार, गोळवळकर गुरुजींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. यामध्ये एका विशेष वर्गाला, विशेष जातीच्या लोकांना स्थान आहे. इतर लोकांना स्थान नाही. आमचा राष्ट्रवाद हा शाहू, फुले, आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना आझाद यांचा राष्ट्रवाद आहे.
आमच्या राष्ट्रवादामध्ये सर्व लोकांना एकत्र घेवून जाण्याचा विचार आहे. तर तुमचा राष्ट्रवाद हा कुठेना कुठे मनुवादी विचारांनी भारलेला आहे. आमचा राष्ट्रवाद समता स्थापन करणारा आहे. राष्ट्रवादीच्या याच राष्ट्रवादाच्या ताकदीवर या देशातील लोकांना ताकद मिळाली आहे. आपण विशेष वर्गाला ताकद देणार्या वर्गाची वकालत करत आहात. त्यामुळे तुमच्या राष्ट्रवादापेक्षा आमचा राष्ट्रवाद कमजोर पडणार नाही. आमच्या राष्ट्रवादाने आम्ही उभे राहून खोटया राष्ट्रवादाला उखडून टाकू, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
