लॉकडाऊन च्या काळात एकाच छत्राखाली एकाच ध्येयाने काम करणाऱ्या नवी मुंबईतील या तीन संस्थांच्या कार्याबद्दल जाणून घ्या
नवी मुंबई: कोविड-१९ चा विळखा वाढायला लागला तेव्हा आधी राज्य सरकारने संचारबंदी व लगेच केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं. त्या दिवसापासून अनेक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, राजकीय पक्षांचे पुढारी यांनी गरजूंना जीवनावश्यक वस्तू/अन्नधान्य, तयार अन्न देण्यास सुरुवात केली. काहींनी फक्त फोटो काढून चमकोगोरी करण्यापूरती सुरुवातीला चार दिवस मदत केली पण काही मंडळी अशी आहेत ज्यांनी हे कार्य लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अविरतपणे चालू ठेवलं आहे. या काळात महाराष्ट्र वार्ताने फक्त अशाच निष्ठेने अविरतपणे समाजसेवा करणाऱ्या संस्था व व्यक्तींची ओळख वाचकांना करून देण्याचे ठरविले आहे.
आज आम्ही तुम्हाला नवी मुंबईतील तीन सेवाभावी संस्थांची ओळख करून देणार आहोत. युगनिर्माते प्रतिष्ठान, बांधिलकी प्रतिष्ठान व रॉयल ग्रुप या तीन सेवाभावी संस्थांनी एकत्र येत नवी मुंबईतील गरजू लोकांना दि. ४ एप्रिल २०२० पासून अन्नदान सेवा देण्यास प्रारंभ केला. युगनिर्माते प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर वसमाने यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही अन्नदान सेवा! याला हातभार लागला तो बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्षा पल्लवी निंबाळकर व त्यांचे सहकारी त्याचसोबत रॉयल ग्रुपचे अध्यक्ष सागर गवारे व यांच्या सहकाऱ्यांची. तसेच या सेवेत भर पडली ती म्हणजे किल्ले बेलापूर रहिवाशांची, स्थानिकांनी या सेवेत ५ दिवसाचे संपूर्ण अन्नदानाची जबाबदारी त्यांनी उचलली. ही अन्नदान सेवा अजतागत सुरूच आहे.

सुरुवातीला COMMUNITY KITCHEN हे किल्ले बेलापूरच्या पायथ्याशी होते. त्यानंतर हे ठिकाणी खारघर या ठिकाणी हलविण्यात आले. सर्व संस्थेच्या शिष्टमंडळाने असा निर्णय घेतलेला आहे की, जोपर्यंत LOCKDOWN आहे तोपर्यंत आपल्या माध्यमातून ही सेवा अशीच चालू राहील. सदर अन्नदान सेवा ही नवी मुंबई येथील बेलापूर, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, कळंबोली, खारघर या ठिकाणी राहत असलेल्या गरजू लोकांना होत आहे. रोज ५५० ते ६०० लोकांना अन्नदान सेवा चालू असून या कार्यात सुरक्षिततेचे नियम पाळून कार्य केले जात आहे. त्याचबरोबर सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व पोलीस बांधव जनतेच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उभे आहे. त्यांनादेखील संस्थेच्या माध्यमातून पाणी व SANITIZER वाटपाची सेवा करण्यात येत आहे.
हे कार्य पूर्णत्वास आणण्याकरिता विशाल पिंगळे, अक्षय चव्हाण, प्रणेश भुवड, मनोज भोईर, योगेश घरत, उपेंद्र पावरी, सचिन निघोट, चेतन शिंदे, अमृता चव्हाण, अभिजित जगताप, राजेश रासकर, अमृता जाधव, वर्षा मोटे, राकेश विश्वकर्मा आदी सहकारी अधिक मेहनत घेत आहेत.
काल दि. १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनाचं औचित्य साधून या मंडळींनी गरजूंना धान्य वाटपाचा कार्यक्रमही आयोजित केला होता.
