जिनोम सिक्वेसिंगच्या चौथ्या चाचणीचा अहवाल जाहीर
मुंबई महापालिकेनं २८१ जणांमध्ये केलेल्या जिनोम सिक्वेसिंग चाचणी नुसार कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या; केवळ ८ जणांना; तर लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या केवळ २१ जणांनाच रुग्णालयात दाखल करावं लागलं. यापैकी प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता उपचारांची कोणालाही गरज लागली नाही. तसेच मृत्यूही झालेला नाही, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. याउलट, कोविड लसीची एकही मात्रा न घेतलेल्या ६९ नागरिकांना मात्र कोरोनाची बाधा झाल्याचं दिसून आलं.
त्यातल्या १२ जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. चौघांना प्राणवायू पुरवठा करावा लागला. आणि तिघांना अतिदक्षता उपचार द्यावे लागले. यामध्ये चार जणांचा मृत्यूही झाला. मृत्यू झालेले चारही रुग्ण ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते आणि यातल्या दोघांना दीर्घकालीन आजार होते. या चारही रुग्णांना ‘डेल्टा व्हेरिअंट’ ची लागण झाली होती आणि हे चारही जण कोविडची लक्षणं दिसल्या नंतर २ ते ५ दिवस उशीरानं रुग्णालयात दाखल झाले.
याचाच अर्थ असा की कोविड लस घेणाऱ्या आणि कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱ्या व्यक्तीला; कोरोना विरूद्धचं संरक्षण तर मिळतंच आणि जर कोविडची बाधा झालीच तरी त्याची तीव्रता अत्यंत कमी असते. म्हणूनच सर्व पात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेणं अत्यावश्यक असून त्याचबरोबर कोविड-१९ प्रतिबंधक नियमांचं कठोर पालन प्रत्येकानं करणं नितांत गरजेचं आहे.
