परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई, दि. १७ : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) चे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
विधानभवन येथे झालेल्या बैठकीत एसटी कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या विविध मागण्या, तक्रारी आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले.
कर्मचारी संघटनांसोबत सकारात्मक चर्चा
एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने चालक-वाहकांवरील कारवाई, आगार व्यवस्थापनातील अडचणी तसेच प्रशासकीय प्रक्रियांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले होते.
या पार्श्वभूमीवर संघाचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांनी सविस्तर चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा हीच महामंडळाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी असलेल्यांच्या बदल्या
बैठकीत एकाच ठिकाणी ३ वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. मंत्री सरनाईक यांनी अशा अधिकाऱ्यांच्या इतर ठिकाणी बदल्या करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले. कर्मचारी संघटनांनी या मागणीवर तीव्र भूमिका घेतली असून ही प्रक्रिया तातडीने राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
चालक-वाहकांच्या अडचणींकडे लक्ष
सामान्य प्रवाशांना चांगली सेवा देणे हे एसटीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगत मंत्री सरनाईक यांनी चालक आणि वाहकांना काम करताना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यावर भर दिला. आगार स्तरावरील निर्णयप्रक्रिया, शिस्तभंग कारवाई आणि प्रशासनातील पारदर्शकता याबाबत न्याय्य पद्धतीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कर्मचारी व प्रशासनामधील संवादावर भर
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, कर्मचारी संघटनांशी नियमित संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडविणे ही एसटी प्रशासनाची सकारात्मक भूमिका आहे. कर्मचाऱ्यांच्या अडचणींवर शक्य तितक्या लवकर निर्णय घेतल्यास प्रवाशांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल. त्यामुळे व्यवस्थापनाने कर्मचारी संघटनांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सामोपचाराने तोडगा काढावा, असेही त्यांनी सांगितले.
वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित
या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच महामंडळातील सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली.
