आज सकाळपासून पावसाचा मुंबईकरांवर मुसळधार अटॅक
गेले अनेक दिवस हुलकावणी देणाऱ्या वरुणराजाने अखेर मुंबईकरांच्या ओंजळीत आज पर्जन्याचे दान टाकलेच. आज सकाळपासून रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. मान्सून चं आगमन रेंगाळलं होतं त्यामुळे गाफील मुंबईकरांवर सकाळी कामावर निघातानाच पावसाने सरप्राईज अटॅक केला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व कल्याण परिसरात पावसाची संततधार चालू आहे. बरेच चाकरमानी ऑफिस ला पोहोचेपर्यंत चिंब भिजून गेले होते. रेल्वे अद्यापतरी सुरळीत चालू आहे.
आज पावसाच्या धुवाधार मूड मुळे अनेक व्हाट्सअप्प ग्रुप वर संध्याकाळसाठी भजी-वड्यांच्या सुक्या पार्टी पासून ते चिकन-मटणाच्या सोबत ओल्या पार्टीचे बेत आखले जात आहेत. आज एफएम रेडिओ वरही ‘रिमझिम गिरे सावन’ या गाण्याची फर्माईश जास्त प्रमाणात केली जात आहे. बाहेर जसा मुसळधार पाऊस पडत आहे त्या बरोबरीने फेसबुक वरही कवितांच्या पावसाला सुरुवात झाली आहे. वर्षाभर गायब असलेले अनेक कवी आज अचानक अवतरले आहेत. असा हा आजचा पाऊस हॅप्पेनिंग आहे इतकं नक्की.
