आगामी ५ ते ६ दिवस तरी कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल
मुंबई, दि. १२: मान्सूनची बहुतांश प्रगती काल मध्यप्रदेश आणि त्यालगतच्या गुजरातच्या भागात झाली. देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यांलगतच्या भागात तो पुढे सरकला नाही. पण येत्या ४८ तासात मान्सून संपूर्ण पूर्व आणि मध्य भारतात दाखल होईल आणि त्यानंतरच्या २ ते ३ दिवसात मोसमी वारे दक्षिण राजस्थान आणि कच्छ वगळता संपूर्ण देशात पोहोचलेले असतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांचा वाढलेला जोर याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसत आहेत. अपेक्षेप्रमाणे काल कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी जोरदार सरींनी हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रात मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊस अनेक ठिकाणी नव्हता. काही ठिकाणीच हलका ते मध्यम पाऊस झाला. घाट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त होतं. मराठवाड्यात काही ठिकाणीच पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज असतानाही अनेक ठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाचा जोरही चांगला होता.
आता आगामी ५ ते ६ दिवस तरी कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची हजेरी राहील. काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी मुसळधार वृष्टीचीही शक्यता आहे. विदर्भात, १३ आणि १४ तारखेला तर कोकणात १५ तारखेस अतिवृष्टीची शक्यता आहे.
