अखेर तो आला! राज्यात ‘मॉन्सून’चं दमदार आगमन
मुंबई, दि.९: दर वर्षी उन्हाच्या काहिलीने व घामांच्या धारांनी हैराण झालेले मुंबईकर ज्याची ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात. तो नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच ‘मॉन्सून’चं आज अखेर महाराष्ट्रात धुमधडाक्यात आगमन झालं आहे.
हवामान खात्याने आधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार मॉन्सून दोन दिवस उशिरानेच महाराष्ट्रात अवतरला असून काल रात्री पासून सुरू झालेल्या पर्जन्य वर्षावामुळे मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. मुंबई लगत असलेल्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, उरण परिसरात गेल्या २-३ दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. हवामान खात्यानेही ९ ते १२ तारखेच्या दरम्यान अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने कोकण किनारपट्टीवरील जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
