सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी जाणार
अमरावती/मुंबई, दि.९: अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना काल उच्च न्यायालयाने दणका दिला. २०१९ सालची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी जे जात प्रमाणपत्र दिलं होतं ते न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं. यासंदर्भात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निकाला नंतर शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला.
ऑनलाइन पद्धतीने झालेल्या सुनावणीच्या वेळी नवनीत राणा नेमक्या दिल्लीत होत्या. यावेळी त्या गैरहजर राहिल्या होत्या हे विशेष. निकाला नंतर एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाण साधला. त्या म्हणाल्या की माझं जात प्रमाणपत्र रद्द होण्याच्या राजकीय खिचडीत शिवसेनाच हात असून कोविड काळात इतर प्रकरणं मागे सारून माझंच प्रकरण अग्रक्रमाने कसं घेतलं? असा सवाल करत त्यांनी कोर्टावरही नाराजी व्यक्त केली.
पुढे त्या म्हणाल्या की या निकालाला आपण पुढील ६ आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. नवनीत राणा यांना उच्च न्यायालयाने कालच्या निकालात खोट्या दस्तऐवजांच्या आधारे अवैध जात प्रमाणपत्र बनवल्यामुळे २ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आपलं पितळ उघडं पडूनही त्या कोणत्या आधारे आपण निर्दोष आहोत असं म्हणत आहेत हे अनाकलनीय आहे. सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल अशी त्यांना अद्यापही आशा आहे हे विशेष.
राजकारणात येण्यापूर्वी नवनीत राणा यांनी तेलगू चित्रपट सृष्टीत अभिनेत्री म्हणून अनेक कमी बजेट च्या चित्रपटात काम केलं होतं. यानंतर एक ब्रेक घेत त्यांनी विदर्भातील वडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी लग्नगाठ बांधली. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ज्यात नवनीत राणा यांचा दारुण पराभव झाला होता. अखेर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर त्या अडसूळ यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडून आल्या. सर्वोच्च न्यायालयाने जर नवनीत राणा यांची याचिका फेटाळली तर आनंदराव अडसूळ यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
