मनसे कार्यालयात काँग्रेसच्या मिलिंद देवरांचे जल्लोषात स्वागत
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाविरोधात राज्यात जाहीर सभा घेण्यास सुरुवात केली आहे. गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्यानंतर भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करू नका असे आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केले आहे.
मनसेने यंदाच्या निवडणुकीत मोदीमुक्त देश करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या तोंडावर मनसे कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत असल्याचे दिसत आहे. याचा प्रत्यय नुकताच आला आहे.
दक्षित-मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी मनसे च्या शाखेला भेट दिली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मिलिंद देवरा यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मनसे-काँग्रेसच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. मिलिंद देवरा यांच्या प्रचार रॅलीत मनसे कार्यकर्त्यांनी सहभाग घेत मोदीमुक्त देश करण्यासाठी मिलिंद देवरा यांना मतदान करण्याचे आवाहन परिसरातील नागरिकांना केले.
