मावळा मशीन नेमके काय आहे?
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सागरी किनारा मार्गाचे दोन महाबोगदे खणणारे ‘मावळा’ टीबीएम कार्यान्वित करण्यात आले. यात सगळ्यांना कुतूहल असलेल्या मावळा महाबोगद्याबद्दल जाणूयात.
बोगदा खणणारे मावळा मशीन (टीबीएमचा) हे या प्रकल्पातील महत्त्वाचे साधन आहे. या टीबीएम मशीनला ‘मावळा’ असे नाव देण्यात आलं आहे. हे अजस्त्र यंत्र १२.१९ मीटर व्यासाचे आहे. देशात आतापर्यंत वापरण्यात येणारे सर्वात मोठ्या व्यासाचे टीबीएम मशीन आहे. तयार होणाऱ्या ११ मीटर बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असेल. अरबी समुद्राखालील तब्बल १७५ एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर अजून १०२ एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. या मार्गावर समुद्राखालून ४०० मीटरचे बोगदे असतील. हे बोगदे खोदण्याचे काम मावळा करणार आहे.
महाबोगदे खणण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत असणार असून ते ‘मलबार हिल’ च्या खालून जाणार आहेत.
दोन्ही बोगदे हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर असणार आहेत. दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७ किलोमीटर इतकी असणार आहे. भारतातील महानगरांमधील रस्ते बोगद्यांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा भारतात पहिल्यांदाच बसविण्यात येणार आहे. सागरी किनारा मार्गाच्या एकूण कामापैकी २० टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. शामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपूल (Princess street flyover) ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी लांबीचा हा ‘सागरी किनारा मार्ग’ असेल.
