“मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारची अनास्था” – अजित पवार
मुंबई, दि. २५: मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. हे अमृत महोत्सवी वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले तरी सरकार हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात गंभीर नाही. मराठवाडा आणि मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षाविषयी सरकारची अनास्था आहे, त्यांना याविषयी काही देणे-घेणे दिसत नाही. तरी सरकारने या विषयी आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सुद्धा हा विषय मी मांडला होता. मात्र अजूनही सरकारकडून या विषयी कोणत्याही हालचाली सुरु नाहीत. मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा करण्याविषयी साधा प्रस्तावसुद्धा सरकारच्यावतीने सभागृहात आणलेला नाही. सरकार यानिमित्त काय कार्यक्रम साजरे करणार आहे का? त्याचे नियोजन काय? हे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले नसल्याबद्दल अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.
