खासदारांच्या मराठीतून शपथ घेण्याने ‘हे’ साध्य होऊ शकतं
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे. महाराष्ट्रातून भाजपचे २३, शिवसेनेचे १८, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४ तर काँग्रेस, MIM व अपक्ष असे अनुक्रमे १-१ खासदार लोकसभेत शपथ घेणार आहेत. गेल्यावेळेप्रमाणे या वेळीही शिवसेनेचे खासदार मराठीतून शपथ घेणार आहेत. याबाबत गेले काही दिवस नेटिझन्स नी एक मोहीम सुरू केली होती. ज्यात महाराष्ट्रातल्या खासदारांनी मराठीतूनच शपथ घ्यावी असे आवाहन करण्यात आले होते. परवाच शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले की गतवेळेप्रमाणे यावेळेसही शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून शपथ घेणार आहेत त्याच बरोबर इतर पक्षातील खासदारही मराठीतून शपथ घेणार असल्याचे ते म्हणाले.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मराठीतून शपथ घेण्याने काय असं मोठं साध्य होणार आहे? इतर वेळी तर हे सगळे महाराष्ट्रात मराठीतच तर बोलतात मग आताच ही मोहीम कशासाठी? तर याचं उत्तर असं, की गेले काही वर्षे मराठी खासदार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून संसदेत प्रश्न उपस्थित करत आहेत, त्याबाबतचा पाठपुरावाही त्यांचा चालू आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही एक निवेदन दिलं होतं. तर मराठी भाषेत शपथ घेण्याच्या मोहिमेमुळे नक्कीच एक दबाव निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे येत्या काळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणं सुलभ होईल. म्हणून ही मोहीम नक्कीच देशाचं लक्ष मराठीकडे वेधून घेण्याच्या कामी येऊ शकते.
