“मराठा आरक्षणासाठी संपूर्ण ताकदीने न्यायालयीन लढाई लढणार” – कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची छ. संभाजीराजे यांच्या उपोषणस्थळी ग्वाही
पुणे: मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी कार्यरत असलेल्या सारथी संस्थेवर सरकारने घातलेल्या निर्बंधांविरोधात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यातील सारथी संस्थेबाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. यावेळी सरकारच्या वतीने नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारच्या वतीने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “प्रामुख्याने सारथीची स्वायत्तता अबाधित राखली जाईल, ओबीसी विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांना सारथीच्या जबाबदारी पासून बाजूला केले आहे.”
पुढे त्यांनी खासदार छत्रपती संभाजी राजेंना सांगितले की, “गुप्ता यांनी जारी केलेले सर्व निर्णय रद्दबातल करण्यात आले आहेत तसेच संस्थेचे संचालक परिहार यांचा राजीनामा फेटाळला आहे.” सर्व आक्षेपांविषयी त्रयस्थ यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असून मराठा आरक्षणासाठी संपूर्ण ताकदीने न्यायालयीन लढाई लढणार असल्याबाबत ग्वाही दिली. यानंतर खासदार छ. संभाजीराजे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
