‘एक भारत श्रेष्ठ भारत-युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत मणिपूरचे विद्यार्थी महाराष्ट्राच्या ५ दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना
मुंबई, दि. २०: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सोमवारी, एक भारत श्रेष्ठ भारत-युवा संगम कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या पाच दिवसांच्या अनुभूती दौऱ्यावर जाणाऱ्या चमूला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या चमूमध्ये तीन प्राध्यापकांसह राज्यातील ३० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २० फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत महाराष्ट्र दौर्यावर जाणाऱ्या मणिपूरच्या युवकांच्या चमूला मुख्यमंत्र्यांनी , केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ. आर के रंजन यांच्या उपस्थितीत इंफाळ येथील मुख्यमंत्री सचिवालय इथून हिरवा झेंडा दाखवला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘एक भारत, अखंड भारत आणि सशक्त भारत’ हे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला एकमेकांना जाणून घेणे आवश्यक आहे. हे अनुभूती दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात सांगितले.
“तुम्ही ज्या राज्यात जात आहात तिथे तुमच्याकडील उत्कृष्टता आणि मणिपूरमधील सर्वोत्तम गोष्टी दाखवा आणि त्यांच्याकडे जे काही सर्वोत्तम आहे ते शिकून घ्या,”, असे केंद्रीय मंत्री डॉ. आर के रंजन यांनी या दौर्यात सहभागी विद्यार्थ्यांना सांगितले.
“आपल्या देशात खूप विविधता आहे, अनेक भाषा आहेत, अनेक संस्कृती आहेत आणि अनेक जातीधर्म आहेत. सशक्त भारत घडवण्यासाठी एक महान शक्तिशाली सामर्थ्याच्या रूपात पंतप्रधान या विविधतेचा उपयोग करत आहेत.” असे त्यांनी सांगितले. भारताची ऐक्याची भावना आत्मसात करण्याबद्दल पंतप्रधानांचा युवकांवर, विशेषत: विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे. हा उपक्रम भारताला एक बळकट राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले.
आपल्या देशातील ईशान्येकडील राज्ये आणि इतर राज्यांमधील युवक-युवतींना परस्परांशी जोडणे तसेच त्यांच्यात परस्परांना जाणून घेण्याची क्षमता निर्माण करणे या उद्देशाने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने एक भारत श्रेष्ठ भारत (ईबीएसबी) अंतर्गत ‘युवा संगम’ या उपक्रमाची संकल्पना मांडली होती. हा कार्यक्रम इतर विविध मंत्रालये आणि विभाग म्हणजेच संस्कृती, पर्यटन, रेल्वे, माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा, गृह व्यवहार मंत्रालय, ईशान्य क्षेत्र विकास विभाग आणि आयआरसीटीसी यांच्या सहकार्याने आयोजित केला जात आहे. युवा संगम या पथदर्शी उपक्रमात १००० तरुण सहभागी होणार आहेत.
त्यांच्या या दौऱ्यादरम्यान, विद्यार्थ्यांना पर्यटन, परंपरा, प्रगती, तंत्रज्ञान आणि परस्पर संपर्क या पाच विस्तृत क्षेत्रांतर्गत बहुआयामी अनुभव घेता येईल. हा एक युवा विनिमय कार्यक्रम आहे असून यात ५ विद्याशाखांमधले ७० विद्यार्थी देखील २७ फेब्रुवारी २०२३ रोजी इंफाळला भेट देतील आणि २७ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत मणिपूरचा दौरा करतील.
