माढ्यातील भाजपाचा उमदेवार अखेर ठरला, यांच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
पंढरपूर: माढ्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारा भाजपच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे. नुकतेच काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून संजय शिंदे आणि भाजपकडून निंबाळकर असा तगडा सामना माढ्यात होणार आहे.
भाजपाने आज (शुक्रवार) देशभरातील ११ उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली. त्यात नाईक यांचा समावेश आहे. माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या ठिकाणी तसाच तगडा उमेदवार देण्याची तयारी भाजपकडून सुरू होती.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसला रामराम करत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती भाजपमध्ये मोठ्या दिमाखात प्रवेश केला होता. मात्र, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपकडून माढ्यातून उमेदवारी मिळेल की नाही यावर साशंकता व्यक्त केली जात होती. राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना टक्कर देण्यासाठी भाजपने नाईक-निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे माढ्याची लढत अजूनच रंगतदार होणार आहे.
