मध्य प्रदेशात टाळेबंदी तर जम्मू काश्मीर, कर्नाटकात संचारबंदी
मध्यप्रदेश, दि.९: मध्य प्रदेशातल्या सर्व शहरांमध्ये आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. देशात आणि राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्यानं हे आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री शिवराज सिह चौहान यांनी सांगितलं. कोरोना रुग्णांना योग्य आणि वेळेवर उपचार मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून विविध खासगी रुग्णालयांमध्येही मोफत उपचारांची सोय केली जात आहे. तसंच, ऑक्सिजन आणि इतर औषधांचाही पुरेसा साठा करण्यात आल्याचं सांगितलं.
जम्मू काश्मीरमधल्या ८ जिल्ह्यांमधल्या शहरी भागात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी विभागीय प्रशासनाला दिले आहेत. या भागांमध्ये कोरोनाचा अधिक फैलाव झाला असल्यानं संचारबंदी लागू करत असल्याचं, असं आदेशात म्हटलं आहे. यानुसार, जम्मू, उधमपूर, कथुआ, श्रीनगर, बारामुल्ला, बडगाम, अनंतनाग आणि कुपवाडा या जिल्ह्यांमध्ये आजपासून रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल.
कर्नाटकातही मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी उद्यापासून २० तारखेपर्यंत रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. कोरोना संसर्ग वाढल्यानं बंगळूर, म्हैसूर, मंगळूर, कलबुर्गी, बिदर, तुमकुर आणि उडुपी या जिल्ह्यांमध्ये रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.
Source – AIR
