मराठा आरक्षण संदर्भात संभाजीराजे छत्रपती कायदे तज्ञ आणि अभ्यासकांशी करणार चर्चा
कोल्हापूर, दि.२४: मराठा आरक्षण संदर्भात येत्या २७ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विरोधी पक्षांशी चर्चा करून आपली भूमिका मांडणार असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापुरात सांगितलं. खासदार संभाजीराजे यांनी आज कायदेतज्ज्ञ, तसंच कोल्हापुरातील प्रमुख संस्था, संघटना, तालीम संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनीधींसोबत बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ ला मराठा समाजासह सर्व अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास वर्गीय समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र, आज मराठा समाजाला आरक्षण नसल्यानं समाजाची हलाखीची स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने समाजात नाराजी पसरली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा दौरा करून आपण कायदे तज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले.

यावेळी बारा बलुतेदारांच्या प्रतिनिधींनी मराठा आरक्षणास पाठिंबा दिला. तसंच संयुक्त जुना बुधवार तालमीनं संभाजीराजे यांच्या भूमिकेस पाठिंबा देणारं निवेदन दिलं. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयानंतर पुन्हा लढा उभारणार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
Source – AIR
