आम्ही ४२५ प्लॅटफॉर्मची उंची वाढवली, पण राज ठाकरेंची राजकीय उंची कमी झाली
मुंबईतील भांडुप मतदारसंघात बुधवारी राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. यावेळी त्यांनी मोनिका मोरे हिला मनसेच्या मंचावर बोलावले होते. मुंबईत पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकलच्या अपघातात मोनिका मोरेने दोन्ही हात गमावले होते.त्यानंतर भाजप खासदार किरीट सोमय्यांच्या पुढाकाराने तिला कृत्रिम हात बसवण्यात आले. भाजपने मोनिकाला नोकरीचं आश्वासन दिले होते त्यांनी ते अजून पर्यंत पूर्ण केले नाही. मोनिका मोरे ही स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडरही होती. मला सांगा काय करायचं ह्या मुलीने आयुष्यभर? कोण जबाबदार आहे ह्याला? असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. याच टीकेला किरीट सोमय्या यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.
“मोनिका मोरेला आम्ही मदत केली आणि राज ठाकरेंनी तिला काय मदत केली याबाबतची माहिती संपूर्ण राज्याला माहिती आहे. मोनिका मोरेमुळे अनेक अपघातग्रस्तांना हिंमत मिळाली आणि आम्ही तब्बल ११०० अपघातग्रस्तांना मदतही केली होती. २० वर्षांच्या मुलीला मंचावर आणून राज ठाकरेंनी राजकारण करु नये, असा सल्ला सोमय्या यांनी दिला.
देशातील ४२५ प्लॅटफॉर्मची उंची आम्ही मोदी सरकारच्या काळात वाढवली आहे, पण आता राज ठाकरे यांची राजकीय उंची कमी झाली आहे. २००९ मध्ये राज यांची उंची जी होती, ती २०१९मध्ये जमिनीच्या खाली गेली आहे, अशा शब्दात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. मोनिकाच्या प्रश्नाचे उत्तर देणं सोमय्या यांनी टाळले आहे.
