
किल्लारी सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा अभिमन्यू पवार यांच्याहस्ते संपन्न
लातूर, दि. २०: लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसाच्या पहिल्या हप्त्याच्या रूपाने २ हजार ६५० रुपये देणार असल्याची घोषणा या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी केली. काल दि. १९ नोव्हेंबर रोजी किल्लारी सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला औसा, निलंगा, उमरगा व लोहारा तालुक्यातील हजारो शेतकरी तसेच आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थितीत लावली होती.

यावेळी बोलताना मुख्य प्रवर्तक आ. अभिमन्यू पवार यांनी यावर्षीचा उसाचा पहिला हप्ता २६५० रु. तर तालुक्यातील इतर कारखान्यापेक्षा ५ रु. अधिकचा दर देण्याची घोषणा केली. हा कारखाना यंदाच्या गळीत हंगामात २ लाख टनाहून अधिक गाळप करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. किल्लारी कारखान्यातील धूर आणि शेतकऱ्यांच्या चूलीतील धूर या गोष्टी एकमेकांवर निर्भर असल्याचे नमूद करून आपल्या हक्काच्या किल्लारी कारखान्यालाच ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले.